लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड : ऋतुजा राजेंद्र आनंदगावकर... सध्या बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या मंजरथ गावच्या या सरपंच मॅडम... पण त्याहीपेक्षा तिची वेगळी ओळख आहे.... ऋतुजा एरॉनॉटिकल इंजिनिअर आहे... एवढं शिक्षण घेतल्यावरही ऋतुजानं गावची सरपंच व्हायचं ठरवलं, हे विशेष...


...गावच्या राजकारणातली तरुणी!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावाच्या विकासाच्या प्रक्रियेत स्वतः सहभागी होऊन एक नवीन आवाहन स्वीकारायचं, असा निश्चय करत ऋतुजानं गावची सरपंचपदाची निवडणूक लढवली आणि चांगल्या फरकानं जिंकलीही... ऋतुजानं पुण्याच्या 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजिनियरींग'मधून प्रशिक्षण घेतलं... तिचे वडील राजेंद्र आनंदगावकर गावच्या विकासासाठी झटणारे... पण तीन अपत्य असल्याच्या कारणावरुन त्यांना निवडणूक लढवता येईना, त्याचवेळी ग्रामस्थांच्या आग्रहावरुन त्यांनी ऋुतुजाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.


महिलांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी आपण सरपंच झाल्याचं ऋतुजा सांगते. सध्या तिचा अहमदाबादमध्ये असलेल्या एका कंपनीशी नोकरीचा बॉण्ड आहे. तो संपताच ती पूर्णवेळ गावच्या विकासासाठी देणार आहे.


गावाला अभिमान


सरपंच झालेल्या मुलीचा तिच्या वडिलांनाही अभिमान आहे. एरॉनॉटिकल इंजिनिअर झालेली सरपंच गावाला मिळाल्याने ग्रामस्थपण खूष आहेत. ऋतुजा गावासाठी चांगल्या योजना आणेल, असा ग्रामस्थांना विश्वास आहे.  


भारत हा तरुणांचा देश आहे असं म्हटलं जातं. ही तरुणाईच भारताला महासत्ता होण्याचं स्वप्न दाखवतेय... गरज आहे ती ऋतुजासारख्या सुशिक्षित मुलींनी विकासाच्या राजकारणात एक पाऊल पुढे टाकण्याची...