मुख्यमंत्र्यांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक, भाजपकडून नार्को टेस्टची मागणी
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या नार्को टेस्टची मागणी
मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कायदा आणि न्यायिक मंडळाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आज बोलविली आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र सरकारविरोधात मोर्चा उघडला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे.
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर विरोधी पक्षाने राज्य सरकारला धारेवर धरलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केलीय. दोघांनी स्वत:ची नार्को टेस्ट करुन तात्काळ राजीनामा द्यावा असे कदम म्हणाले.
'या प्रकरणाच्या संदर्भात मी आज सकाळी ११ वाजता मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागरले यांची भेट घेईन. बरीच रहस्ये उघडकीस आल्यानंतर आता सरकारला पळायला मार्ग नसेल असेही कदम म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी आज (सोमवार) सायंकाळी साडेचार वाजता आपल्या निवासस्थानी राज्य कायदा व न्याय विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली आहे.
माजी पोलिस आयुक्तांनी गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यांना बार आणि हॉटेलमधून दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलाय. यानंतर राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत.
या आरोपानंतर शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक झाली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उपस्थित होते. परमबीरसिंग यांच्या पत्रात केलेले आरोप गंभीर आहेत, परंतु त्यात पुरावा देण्यात आलेला नाही. या आरोपांची सखोल चौकशी होणे आवश्यक असून उद्धव ठाकरे या प्रकरणात अंतिम निर्णय घेतील असे बैठकीनंतर शरद पवार यांनी सांगितले.