Sadabhau Khot Speech : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचं एक भाषण व्हायरल होतंय. मंत्री असताना घरासमोर गाड्यांची रांग होती, लोकांची गर्दी होती.. मात्र मंत्रिपद गेलं.. कणसातील दाणे संपल्यावर पाखरं उडून जातात तशी लोकंही निघून गेली.. अशी खंत सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी व्यक्त केली.. राजू शेट्टींवर (Raju Shetty) बोललो नाही तर चर्चाच होत नाही अशी गुगलीही खोत यांनी टाकली. मी मंत्री झालो त्यावेळी घरासमोर इतकी गर्दी व्हायची की दोन किलोमीटर गाडीच्या रांगा लागायच्या, पीए वाढले, अधिकारी आले, लोकं कौतुक करायला लागली, लोकं म्हणायची भाऊ तुमच्यासारखा मंत्री नाही असं म्हणत कौतुक करायची. पण कौतुक माणसाला फसवत असतं, असं सदाभाऊ यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पाखरं उडून गेली'
पण मंत्रीपद गेलं आणि भरलेल्या कणसातील दाणं संपल्यावर पाखरं उडून जातात तसं झालं, पाखरं उडून गेली, मी एकटाच राहिलो, कौतुक करणारा देखील राहिला नाही, कौतुक तुमच्यासाठी आहे की पदासाठी हे ओळखता आला पाहिजे अशी खंत खोत यांनी व्यक्त केली. मंत्री असताना किती चौकशी समित्या नेमल्या मलाच माहित नाहीत, असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. 


'एकनाथ खडसेंकडून कानमंत्र घेतला'
मी मंत्री असताना पहाटे चार पर्यंत अभ्यास करायचो, सभागृहात तयारीने जायचो पण प्रश्न उत्तर सुरू झाले की कागदच सापडत नव्हती असा किस्सा सदाभाऊ यांनी सांगितला. त्यामुळे मी एकनाथ खडसेंचा (Eknath Khadse) सल्ला घेतला. सभागृहात बसून राहायचं आणि एखादा प्रश्न गहन आला की म्हणायचं सन्माननीय सदस्य निश्चित याला न्याय मिळाला पाहिजे, चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू असं म्हणायचं. पुढचा प्रश्न विचारला तर चौकशी समिती नेमली जाईल असं सांगायचं. पण आज पर्यंत किती चौकशी नेमल्या आणि कुणाला नेमल्या हे मलाच पत्ता नसायचा. त्यानंतर मी सभागृहात अभ्यास करायचा बंद केला. मधल्या वाटेने पळून जाता येतं हे मला कळालं. पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासारखे नाही... असा टोला सदाभाऊंनी लगावला. 


'म्हणून राजू शेट्टींवर बोलतो'
कधीकाळी सहकारी असलेल्या राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात आता विस्तवही जात नाही. त्यानंतर सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी एकमेकांवर अनेकवेळा आगपाखड केली. पण पहिल्यांदाच त्यांनी आपण राजू शेट्टी यांच्यावर का बोलतो हे जाहीरपणे सांगितलं. बातमी वाईट किंवा चागंली कशीही येऊ दे पण बातमी आलीच पाहिजे. कारण बातमी आली तरच समाजाला कळतं की हा गडी अजून जिवंत आहे. माणूस चर्चेतून संपला की त्याचं मूल्य संपतं, त्यामुळे माणूस हा नेहमी चर्चेत असला पाहिजे. मला अनेक जण विचारतात तुम्ही राजू शेट्टीवर का बोलता. पण राजू शेट्टी वर बोललो नाही तर चर्चाच होत नाही. मी बोललो तर राजू शेट्टी बोलतात. त्यामुळे दोघेजण चर्चेत राहातो, असं उत्तर सदाभाऊ खोत यांनी दिलं.