अहमदनगर : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पुराराने हाहाकार माजला आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त यांच्याकडून १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी साईबाबा संस्थानने १० कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच डॉक्टरांची टीम आणि औषधे उपलब्ध करुन देणार आहेत, अशी माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्‍यामध्‍ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या जलप्रलयाच्‍या थैमानामुळे विशेषत: पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा या जिल्‍ह्यातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गांवेही उध्‍वस्‍त  झालेली आहेत. 


ही नैसर्गिक आपत्‍ती भीषण असून आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजून या पुरग्रस्‍तांसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्‍याचा निर्णय साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍यावतीने घेण्‍यात आला आहे. हा निधी न्‍यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहुन मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍यात येणार आहे. संस्‍थानाच्यावतीने परिस्‍थीती बघून वैद्यकीय पथक आणि औषधेही पाठविण्यात येणार आहे. 



राज्‍य शासन पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्‍यात आलेली ही आपत्‍ती मोठी असून या आपत्‍तीतुन बाहेर पडण्‍यासाठी श्री साईबाबांच्‍या चरणी प्रार्थना करीत असल्‍याचे डॉ. हावरे यांनी सांगितले.