`खरे मोदी कोणते? भ्रष्टाचार सहन करणार नाही म्हणणारे, की भावनाताईंकडून राखी बांधून घेणारे`
सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे बाण
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून बाहेर पडत आमदारांचा एक गट आपल्यासोबत घेत फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडीमध्ये घुसमट होत होती त्यासोबतच निधी मिळत नसल्याचे आरोप आमदारांनी केले. आमदारांनंतर शिवसेनेच्या 12 खासदारांनीही भाजपला पाठिंबा दिला होता. यामध्ये भावना गवळी यांचाही समावेश होता. भावना गवळी यांच्या मागे गेली 3 वर्षे ईडीचा ससेमीरा होता मात्र त्यांनी मोदींना राखी बांधल्यानंतर सर्व काही ओके झालं आहे. याचाच धागा पकडत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. (Samana Editorial on PM Narendra Modi)
पंतप्रधान मोदी यांच्याकडून लोकांना आजही अपेक्षा आहेत, पण संभ्रम असा की, कोणते मोदी खरे? लाल किल्ल्यावरून भ्रष्टाचार संपूर्ण मिटविण्याची गर्जना करणारे मोदी खरे, की कालपर्यंत ज्यांच्यावर ‘ईडी’ कारवाईचे भय होते व त्या भयाने भूमिगत झालेल्या खासदार भावनाताईंचे रक्षाबंधन करून घेणारे मोदी खरे? भाजपने तरी यावर प्रकाशझोत टाकावा, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर टीकेचे बाण सोडले आहेत.
गवळी अनेक वर्षे खासदार आहेत. मागची साडेतीन वर्षे त्यांना ‘ईडी’ने पीडले. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा शोध घेण्यासाठी ‘महात्मा’ किरीट सोमय्या हे गवळीताईंच्या वाशिम मतदारसंघात पोहोचले. त्यांनी वाशिमच्या भूमीवरून जाहीर केले, ‘‘भावना गवळींना भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल. भावनाताई जेलमध्ये जाणारच!’’ पुढे काय झाले?, असा सवालही करण्यात आला आहे.
दरम्यान, भावना गवळी संकटात असताना भाजपमधील एकही ‘भाऊ’ त्यांच्या मदतीस धावला नाही. म्हणजे एक तर भावना गवळी व त्यांच्या लोकांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले व आता ‘वॉशिंग मशीन’मध्ये प्रवेश करताना त्यांची सर्व प्रकरणे स्वच्छ झाली व त्यांना पंतप्रधान भेटीचा लाभ मिळाला, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.