सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, कोरोना हे निव्वळ थोतांड आहे, शासन हा थोतांड का वाढवत आहे कळत नाही, हे देशात चाललेले षडयंत्र असल्याचं वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी यांनी केलं आहे. मुळात कोरोना वगैरे काही नाही असं सांगत कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन करणं चुकीचं असल्याचं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पंढरपूरच्या वारीवर घेण्यात आलेल्या बंदीच्या बाबतीत वारकर्‍यांनी विरोध करून रस्त्यावर उतरायला हवं होतं, आजचे राज्यकर्ते किमतीचे नाहीत' अशी टीका भिडेगुरुजी यांनी केली आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.


व्यापारी पेठा लवकर उघडव्यात काहीही होणार नाही, उलट लॉक डाऊनमुळे लोकांचं मोठे नुकसान होत आहे. कोरोनामुळे राजकीय नेते काय लायकीचे आहेत हे समजलं आहे. ते देशाचे सेवक नाहीत तर स्वतःचे पोशिंदे आहेत आणि स्वार्थी आहेत अशी टीकाही संभाजी भिडे यांनी केलीय. आषाढी दिवशी सर्व मंदिरे का उघडत नाहीत असा जाब सर्वानी विचारला पाहिजे आणि मंदिरांचं टाळे काढण्यासाठी सर्वजण एकत्र येणार का? असा सवालही भिडे यांनी उपस्थित केला.


याआधीही आषाढी वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे असे वक्तव्य करत आषाढी वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली होती. 


कोरोना हा काही रोग नाही, कोरोना होवून जी माणसे मरत आहेत ती मुळात जगण्याच्या लायकच नाहीत, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं होतं. कोणत्या शहाण्याने मास्क लावण्याचा सिद्धांत काढला, असा सवाल भिडे यांनी केला होता. मास्क लावण्याची अजिबात गरज नाही. हा सगळा मूर्खपणा आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले होते.