पुणे : शिवप्रतिष्ठानच्या धारकरी कार्यकर्त्यांना माऊलींच्या पालखी समोर चालण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांनी संभाजी भिडे यांच्या 'शिवप्रतिष्ठान'ला एक नोटीस पाठवली आहे. संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचे शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत, असं या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे. परंतु, दिंड्यांची शिस्त न मोडता तसेच पालखी सोहळ्यात विलंब होणार नाही याची काळजी घेत शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकतात तसंच भिडे गुरुजी जर वारकरी म्हणून सहभागी होत असतील तर हरकत नाही, असं आळंदी देवस्थानच्या वतीने सांगण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, पांडुरंगाच्या भेटीसाठी अलंकापुरीकडे निघालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची पालखीचं आगमन आज पुण्यनगरीत होणार आहे. प्रथेप्रमाणे नाना-भवानी पेठेत पालखी सोहळा दोन दिवस मुक्कामी असेल. प्रथेप्रमाणे पुणे-मुंबई रस्त्यावरील कमलनयन बजाज उद्यान इथं दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, गणेशखिंड रस्ता, फग्र्युसन रस्ता, डेक्कन, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता या मार्गाने पालखी सोहळा मुक्कामी पोहोचेल. 


सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुण्यात कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय. तर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी असेल. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असेल.