`राष्ट्रवादीचे असले तरी अजित पवार...` शिंदे, फडणवीसांबद्दल काय म्हणाले संभाजी भिडे
Sambhaji Bhide On Ajit Pawar: मी काही राजकारणी नाही. ज्याला काही कळत नाही. फक्त देव-देश-धर्मासाठी काम करणारे शिवप्रिष्ठानचे लक्षावधी तरुण मुलं, आम्ही सगळे ही समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत आहोत असा शब्द संभाजी भिडे यांनी जरांगेंना दिला.
Sambhaji Bhide On Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत. जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या जातील पण त्यांनी उपोषण सोडावे असा निर्णय सर्व पक्षीय बैठकीत झाला. हा संदेश घेऊन मंत्री संदीपान भुमरे आणि अर्जुन खोतकर मनोज जरांगेंच्या भेटीला गेले. दरम्यान शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांची उपोषणस्थळी एन्ट्री झाली आणि एक वेगळेच वातावरण पाहायला मिळाले.
मराठा आरक्षणाची तुमची मागणी योग्यच आहे. यासाठी शिवप्रतिष्ठान संस्था तुमच्यासोबत आहे. तुम्ही उपोषण सोडा अशी विनंती संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे यांना केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावरही भाष्य केले.
मी काही राजकारणी नाही. ज्याला काही कळत नाही. फक्त देव-देश-धर्मासाठी काम करणारे शिवप्रिष्ठानचे लक्षावधी तरुण मुलं, आम्ही सगळे ही समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत आहोत असा शब्द संभाजी भिडे यांनी जरांगेंना दिला. मराठा समाजाला जसं पाहिजे तसं आरक्षण मिळालंच पाहिजे या निश्चयानं आम्ही तुमच्या पाठिशी उभे आहोत. तुम्ही जे करताय ते योग्य असे ते म्हणाले.
एक चांगली गोष्ट आहे. आत्ता सत्तेत असणारे एकनाथ शिंदे अजिबात लबाडी करणार नाहीत. देवेंद्र फडणवीस लुच्चेपणा करणार नाहीत असे संभाजी भिडे यांनी म्हटले. ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही भाष्य केले. अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले, तरी काळजी करणारा माणूस आहे, असे ते यावेळी म्हणाले.
माझं असं मत आहे की आपण हे आंदोलन जिवाच्या आकांतानं तुम्ही चालवत आहात. तुमच्या तपश्चर्येला यश मिळणार आहे. उगीच ते राजकारणी आहेत म्हणून भीती बाळगू नका. आणि ते शब्द देतील तो त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायचं काम माझ्याकडे लागलं, असे यावेळी संभाजी भिडे यांनी जरांगेंना सांगितले.
दरम्यान संभाजी भिडे यांच्या उपस्थितीमुळे माझ्या आंदोलनाला बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.दरम्यान संभाजी भिडे यांच्या भेटीनंतर जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.