राम गणेश गडकरींच्या जागी संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानं खळबळ
पुण्यात पुन्हा एकदा पुतळ्यांचा वाद
पुणे : संभाजी उद्यानातील मराठी कवी, नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा काढणाऱ्या तरुणानं आज त्याठिकाणी संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानं एकच खळबळ उडाली. समाज माध्यामावर ही बातमी पसरताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन त्या ठिकाणचा पुतळा बाजूला काढून ठेवला. संभाजी उद्यानात संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशी संभाजी ब्रिगेड, स्वाभिमान संघटना आदींची मागणी आहे. मात्र महापालिकेकडून तिला कुठलाच प्रतिसाद नाही. असं असताना स्वताला स्वाभिमान संघटनेचा कार्यकर्ता असल्याचं सांगणाऱ्या गणेश कारले नावाच्या तरुणानं त्याठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळा बसवला. रात्रीच्या अंधारात हा प्रकार घडला आहे. त्यानंतर स्वत:च्या कृतीचं समर्थन करणारी पोस्ट त्यानं सोशल मीडियावर प्रसारित केली आहे.
गडकरींचा पुतळा अन्य दुसऱ्या नाट्य सभागृहासमोर बसवला तरी संभाजी ब्रिगेडची हरकत नाही. परंतु संभाजी उद्यानामध्ये गडकरी यांचा पुतळा चालणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडने याआधीच दिला होता. ३ वर्षापूर्वी राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी बिग्रेडने तोडला होता. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून गडकरींचा पुतळा बसवण्यासंदर्भात महापालिकेकडे पाठपुरावा केला जातो आहे. पण सामाजिक वातावरण बिघडू नये म्हणून महापालिकेने अजून पुतळा बसवला नाही.
छत्रपती संभाजी उद्यानांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवला नाहीतर १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीला लाखो शिवप्रेमींना घेऊन संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करेल इशारा देखील देण्यात आला आहे.