विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबाद हे नाव औरंगजेबावरुन पडलं आहे. पण शिवसेनेला काही ते मान्य नाही.  बाळासाहेबांनी या शहराचं नाव संभाजीनगर करण्याची हाक 1988ला दिली आणि तेव्हापासून वाद सुरू झाला आहे. दर महापालिका निवडणुकीला हा वाद पेटतो.  काही पक्षांनी शहरात लव्ह औरंगाबादचे बोर्ड लावले, त्याला उत्तर म्हणून शिवसेनेनंही सुपर संभाजीनगर बोर्ड शहरात लावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादचं संभाजीनगर व्हावं, हे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे. त्यामुळे नाव बदलणारच, असं म्हणत शिवसेना नेते आक्रमक झालेत. तर  शिवसेनेच्या या मागणीला काँग्रेसनं थेट विरोध केला आहे. नामांतराचा मुद्दा किमान समान कार्यक्रमात नाही, असा दाखला काँग्रेस देतंय. 


भाजप आणि मनसे मात्र शिवसेना-काँग्रेसच्या भांडणाची मजा बघतंय.  काँग्रेसच्या विरोधानंतर शिवसेना ठाम भूमिका घेणार की सत्तेपुढे लाचार राहणार, असा त्यांचा सवाल आहे. राजकारणाच्या या भाऊगर्दीत याही वेळी नाव बदलणार नाही अशीच चिन्हं दिसतायत. कारण विभागीय आयुक्तांनी सुद्धा प्रस्ताव पाठवून आता 9 महिने झाले मात्र तो प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडून आहे.



त्यात अजून रेल्वे विभागानं सुद्धा नाहरकत प्रमाणपत्र दिलेलं नाही. नावाचं माहीत नाही पण महापालिका निवडणूक होईपर्यंत राजकारण मात्र जोरदार रंगणार आहे.