Sambhajiraje Chhatrapati on Gautami Patil: लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव सध्या महाराष्ट्रात काही ना काही कारणाने चर्चेत असतं. सध्या तिच्या पाटील आडनावावरुन वाद सुरु असून मराठा संघटनांनी आक्षेप घेतला आहे. तिने पाटील आडनाव लावू नये अशी मागणी करण्यात येत आहे. गौतमीच्या आडनावावरुन वाद सुरु असताना संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मात्र तिला जाहीर पाठिंबा दिला होता. पण आता मात्र संभाजीराजे यांनी तिला दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे. अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण अशा शब्दांत त्यांनी आपलं मत मांडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"महिलांनी आपले गुण व कतृत्व दाखवायला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. मराठा समाजातच नाही तर अनेक समाजातील लोकसुद्धा पाटील आडनाव लावतात. त्यामुळे पाटील हे आडनाव नसून तो किताब आहे. कलाकारांना सुरक्षा मिळायला पाहिजे", असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडलं होतं. 


संभाजीराजेंनी पाठिंबा घेतला मागे


संभाजीराजे यांच्या विधानानंतर त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. त्यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर संभाजीराजेंनी ट्वीट केलं असून "या कलाकाराची "कला" मी बघितली. आता असे वाटत आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा 'कले'ला नको रे बाबा", संरक्षण असं म्हणत आपलं विधान मागे घेतलं आहे. 



संभाजीराजेंनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे?


"काल एका पत्रकाराने एका महिलेचा "कलाकार" असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे. मात्र आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची "कला" मी बघितली. आता असे वाटत आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा 'कले'ला नको रे बाबा संरक्षण !," असं ट्वीट संभाजीराजे यांनी केलं आहे. 



संभाजीराजे काय म्हणाले होते?


पण संभाजीराजे यांनी मीडियाशी बोलताना गौतमीचं नावही घेतलं होतं. ते म्हणाले होते "छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिले. त्यामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. फक्त महिलांनाही स्वातंत्र्य आहे. महाराष्ट्र हे वेगळे राज्य आहे. म्हणूनच गौतमी पाटील यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. कलाकाराला संरक्षण मिळाले पाहिजे, हे या मी मताचा आहे".