Good News! नागपूर ते भिवंडी अवघ्या आठ तासांत, कसारा घाटाचा प्रवासही 8 मिनिटांत होणार
Maharashtra Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग लवकरच प्रवाशांचा सेवेत येणार आहे. आता अंतिम टप्प्याचे काम सुरू असून सप्टेंबरअखेर काम पूर्ण होणार आहे.
Maharashtra Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत समृद्धी महामार्ग प्रवाशांचा सेवेत येणार आहे. या महामार्गामुळं नागपूर ते मुंबई अंतर केवळ आठ तासांत पूर्ण करण्यात येणार आहे. समृद्धीचा इगतपुरी ते ठाण्यातील अमने हा शेवटचा 73 किमी लांबीचा टप्पा येत्या सप्टेंबरअखेपर्यंत पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचे काम 99 टक्के पूर्ण झाले आहेत. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर नागपूर ते भिवंडी अंतर केवळ आठ तासांत पूर्ण होणार आहे. तर, इगतपूरी ते अमणे हे अंतर सव्वा तासांत पूर्ण करता येणार आहे. त्याचबरोबर, ठाणे ते नाशिकसाठी केवळ अडीच तास लागणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या या टप्प्यामुळं प्रवासाचे अंतर कमी होणार आहे तसंच, इंधनाची बचतदेखील होणार आहे.
नागपूर ते शिर्डी या 520 किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले होते. तर, दुसऱ्या टप्पा शिर्डी ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंजपर्यंत एकूण 80 किमी लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर भरवीर इंटरजेंच ते इगतपुरी हा मार्ग खुला करण्यात आला होता. एकूण 701 किमी पैकी 625 किमी लांबीचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर, उर्वरित 76 किमी लांबीच्या इगतपुरी ते आमणे सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
कसारा घाटात 8 मिनिटांचा प्रवास
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यात एकूण 5 बोगदे आहेत. त्यातील इगतपुरी येथील आठ किमीचा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा आहे. तसंच, देशातील सर्वात रुंदीचा बोगदा असणार आहे. या बोगद्यामुळं आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा अंतर पार होणार आहे.
समृद्धी महामार्गावरील अंतिम असा हा ७६ किमीचा टप्पा सर्वात किचकट आहे. यामध्ये तब्बल १७ दऱ्या आहेत. त्यावर १७ पुलांची उभारणी केली आहे. त्यांची एकत्रित लांबी तब्बल ११.५ किमी आहे. सर्वाधिक लांबीचा व्हॅलीपूल २.२८ किमी लांबीचा असून तो भातसा नदीवर उभारण्यात आला आहे.