दिनेश दुखंडे झी मीडिया, अमरावती : समृद्धी महामार्गासाठी सरकारकडून मिळत असलेला पाच पट मोबदला कुणाला नकोय ? मोबादल्या पोटी मिळणारी मोठी रक्कम कुणाला वाडवडिलांची पुण्याई वाटतेय, तर कुणी या पैशातून आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतोय...शेतकऱ्याचा त्याच्या जमिनीचा सरकारशी नेमका व्यवहार कसा होतो आणि तो होताना किंवा झाल्यानंतर नेमकी त्याच्या मनात काय घालमेल सुरु असते याचा आढावा घेतलेला हा रिपोर्ट....


शेतकऱ्यावर दडपण आलंय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खांडेश्वर तालुक्यातलं हे तहसील कार्यालय...समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी शेतक-यांच्या जमिनीचं खरेदीखत तयार करण्याची कार्यवाही सध्या इथं सुरु आहे... इतकी वर्षं मायेनं सांभाळलेला, जीव लावलेला जमिनीचा तुकडा आता सरकारचा होणार या भावनेनंच शेतकऱ्यावर दडपण आलंय..समृद्धी महामार्गाला असलेला शेतकऱयांचा विरोध सरकारच्या मोबदल्यापुढे केव्हांच फिका पडलाय...जमीन दिली तर त्याचा घसघशीत मोबदला मिळणार आणि दिली नाही तर सरकार ती बळजबरीनं घेईल याची भीती, अशा विचित्र कात्रीत शेतकरी सापडलाय...पण काहींसाठी जमिनीचा हा व्यवहार जणू वाडवडिलांची पुण्याईच ठरलीय...


हरिहरराव मोरे हे त्यापैकीच एक...एका मल्टिनॅशनल कॉर्पोरेट कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते गेली सात-आठ वर्षे नागपूरमध्ये पत्नीसोबत पुढचं निवांत आयुष्य जगतायत....मुलगा अमेरिकेत, मुलगी दिल्लीत स्थायिक आहे..... मोरेंच्या वाडवडिलांची सालोडमध्ये १८ एकर जमीन आहे... यापैकी सरकारला समृद्धी महामार्गासाठी आठ एकर जागा हवी होती... सोयाबीन, कापूस अशी पिकं ते या जमिनीत घेत असंत, जमीन भाड्यानं कसायला दिली होती... ठीकठाक उत्पन्न मिळत होतं... पण आता अचानक त्यांच्या आयुष्यात अधिकची समृद्धी आलीय...


हिश्यांवरुन भावांमध्ये वाद


मुंगळूरचा वाडा गावातलं शिरपाते कुटुंबात जमिनीच्या हिश्श्यावरुन भावांमध्ये वाद होते. पण जमिनीचा मोठा मोबदला लक्षात घेत कुटुंबियांनी ते सामोपचाराने मिटवलेत...


शेतकरी कुटुंबातले तंटे सोडवावे लागतायत


समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे... त्यासाठी जलदगतीनं भूसंपादन होणं आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय अधिका-यांना प्रसंगी शेतकरी कुटुंबातले तंटे सोडवावे लागतायत...एकीकडे समृद्धी महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होत असल्याचा दावा काही तज्ञ करतायत...तर दुसरीकडे शेतकऱ्याला त्याच्या कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तात्पुरता का होईना, पण तातडीनं मार्ग सापडल्याचंही बोललं जातंय...