रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : चाळीस हजारांची लाच घेताना दोन जीएसटी अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मुल्यवर्धीत करातील त्रुटी दूर करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विभागातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी राजेंद्र महालिंग खोत (वय 57 ) आणि कर सहाय्यक शिवाजी महादेव कांबळे (वय 32) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीएसटी कार्यालयात सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली. आज त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस सुनावण्यात आली.


तक्रारदार यांच्या पत्नीची कवठेमहांकाळ येथे बसवेश्वर इंडस्ट्रीज आहे. त्या ठिकाणी फर्निचर तयार केले जाते. या कारखान्याच्या मागील तीन वर्षाचा मुल्यवर्धित कर मार्च 2019 मध्ये ऑनलाईन पद्धतीने भरला होता. 



जीएसटी कार्यालयातील राजेंद्र खोत आणि शिवाजी कांबळे यांनी तक्रारदारांना वारंवार फोन करुन मुल्यवर्धित करात त्रुटी निघण्याची शक्यता आहे. तुम्ही एक लाख रूपये द्या म्हणजे तुमच्या करामध्ये आम्ही त्रुटी काढणार नाही असे म्हणून लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयामध्ये तक्रार अर्ज केला होता. 


तक्रारदार यांच्या आलेल्या अर्जानुसार कार्यालयामध्ये पडताळणी करण्यात आली. पडताळणी मध्ये राजेंद्र खोत यांच्या सांगण्यावरून शिवाजी कांबळेने तक्रारदार यांच्याकडे 70 हजार रूपये मागणी केली. चर्चेअंती 60 हजार रुपये घेवून येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. 


त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जीएसटी विभागात सापळा रचला. राजेंद्र खोत यांनी तक्रारदारांकडे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम शिवाजी कांबळे यांच्याकडे देण्यास सांगितले. 


शिवाजी कांबळे याने चाळीस हजार रूपये स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले. दोघांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यां दोघांना अटक करण्यात आली होती. 


आज त्यांना न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कास्टडी न्यायालयाने दिली आहे. राज्यतील जीएसटी विभागामधील ही दुसरी मोठी कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांनी दिली.