रवींद्र कांबळे, झी २४ तास, सांगली : महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीचा धुरळा पुन्हा उडू लागला आहे. तसतशा शर्यतीच्या बैलांच्या किमती देखील वाढू लागल्या आहेत. सांगलीतल्या हरण्या नावाच्या शर्यतवीर बैलाची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. चांगल्या ब्रँडच्या आलिशान कारपेक्षाही हरण्याची किंमत जास्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरच्या संदीप पाटलांच्या मालकीचा हा बैल म्हणजे शर्यतींची जान आहे. बैलगाडा शर्यतीतला मिल्खा सिंगच जणू असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत त्यानं ४० हून अधिक शर्यती जिंकल्या आहेत. प्रत्येक शर्यतीत अव्वल नंबर पटकावणा-या हरण्याची किंमत ऐकाल तर तुम्हालाही धक्का बसेल.


हरण्याचा जन्म मिरज तालुक्यातल्या सलगरे गावचा आहे. 4 वर्षांचा असताना सलील चौगुले यांच्याकडून संदीप पाटलांनी तो सव्वा ६ लाख रुपयांना खरेदी केला. आता त्याची किंमत ३५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्याला विकत घेण्यासाठी अनेकांनी बोली लावली आहे.



सांगली जिल्ह्यातल्या अंकले गावात हरण्याची अशी खाशी बडदास्त ठेवली जाते. पाटील यांच्या ५ एकर शेतात संदीप झिंजे हरण्याची देखभाल करतात. त्यांच्याशिवाय हरण्या कुणाला जवळपास फिरकू देखील देत नाही.


हरण्याचा रोजचा खर्च 1 हजार रुपये आहे. 2 लिटर म्हशीचे दूध आणि 3 लिटर गायीचे दूध,असे रोज 5 लिटर दुध तो पितो. हरभरा, बाजरी, मटकी, सातू याचा 2 किलो भरडा सकाळी आणि संध्याकाळी हा त्याचा आहार आहे. शिवाय ओली आणि सुकी शाळू, वैरण दिलं जातं. दररोज गरम पाण्यानं त्याला अंघोळ घातली जाते. शर्यत जिंकल्यावर त्याची लोण्यानं मालिश केली जाते. त्याला बसायला खास रबरी मॅटची व्यवस्था आहे.


महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये हरण्या सॉलिड फेमस आहे. हरण्या जिथं जातो, तिथं त्याचं नाव घुमतं. त्यामुळंच लाखो रुपयांची दौलत देखील या विक्रमवीर हरण्यापुढं फिकी आहे.