रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत सध्या रूग्णांची ऑनलाइन नोंदणी केली जातेय. या नोंदणीत अव्वल येण्यासाठी मिरज आणि सांगली शासकीय रूग्णालयात पोस्टर बॉईज फंडा वापरला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पोस्टर बॉईज' हा सिनेमा तुम्ही पाहिला असेलच... नसबंदी शस्त्रक्रियांचा आकडा फुगवण्यासाठी बोगस फोटो वापरण्यात आल्याचा प्रसंग 'पोस्टर बॉईज'मध्ये दाखवण्यात आला होता. त्याचाच कित्ता गिरवला जातोय तो सांगली आणि मिरजच्या शासकीय रुग्णालयात... राज्यातील नाशिक, सांगली, बीड, चंद्रपूर, अकोला, पालघर या सहा जिल्ह्यांत सध्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबवलं जातंय. पहिल्या टप्प्यात आरोग्य पूर्व तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश सरकारनं दिलेत. या ऑनलाइन नोंदीत मिरज आणि सांगलीच्या शासकीय रुग्णालयात गडबडी झाल्याचं उघड झालंय.  


आजारांची पूर्व तपासणी न करताच ऑनलाईन नोंदी केलेल्या रुग्णांची नावं 'झी 24 तास'च्या हाती आलीत. धक्कादायक बाब, म्हणजे जुन्या केसपेपरच्या आधारे रूग्णांची आणि चक्क मृतांची नावं देखील त्यात नोंदवण्यात आलीत. ऑनलाइन नोंदणीत पहिला क्रमांक येण्यासाठीच मिरज आणि सांगली शासकीय रूग्णालयानं हा खटाटोप केल्याचं समोर येतंय. या अभियानात सांगलीनं नाशिक आणि बीडलाही मागे टाकलंय.


सांगली जिल्ह्यात आजच्या तारखेला 2 लाख 75 हजार 81 रुग्णांची नोंद झालीय. त्यापैंकी मिरजमध्ये 1 लाख 89 हजार 114 आणि सांगलीत 55 हजार 314 रुग्णांची नोंद झालीय. मिरज आणि सांगली रुग्णालयात दररोज सरासरी 700 ते 1 हजार रुग्णांची ओपीडी आहे. मग 9 ते 25 मे दरम्यान तब्बल 2 लाख 44 हजार 428 एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्ण कसे आले? असा प्रश्न निर्माण होतोय. हा आकडा खरा मानला तर दररोज सरासरी 15 हजार 277 रुग्णांची तपासणी हॉस्पिटलमधल्या 300 डॉक्टरांनी केली का? बाकीचे उपचार थांबवून डॉक्टर फक्त हेच काम करत होते का? अगदी सुट्टीच्या दिवशी देखील डॉक्टर रूग्ण तपासत होते का? असे सवाल केले जात आहेत. 


मात्र, जुन्या केसपेपर नोंदीवरून ऑनलाइन नोंदणी केली जात असल्याचा आरोप मिरज हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी साफळे यांनी फेटाळून लावलाय. दरम्यान, रुग्ण नोंदणीचं काम चुकीच्या पद्धतीनं होत असेल तर संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन खासदार संजयकाका पाटील यांनी दिलंय. 


ग्रामीण भागातल्या वंचित, गरीब, गरजू रुग्णांची नोंदणी व्हावी, हा या अभियानाचा हेतू आहे. मात्र, या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातोय. ऑनलाईन नोंदणीत ‘नंबर वन’ होण्यापेक्षा दवाखान्यात आलेल्या रूग्णांची योग्य तपासणी होणं गरजेचं नाही का?