रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : राज्यात सत्तांतरानंतर महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांभोवती संशयाचे ढग दाटून आलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांच्या मधील नाराजी प्रकर्षाने जाणवत आहे. उपमुख्यमंत्रीपदानंतर आता विधान सभेतील विरोधी पक्षनेते पदाची निवड करतना पक्षाने डावलल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातच आता जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील (Pratik Patil) यांच्या अभिनंदन फलकावरून पक्षाध्यक्ष शरद पवारांसह (Sharad pawar), विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे फोटो गायब झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सध्या सांगलीत जोरदार उलट सुलट चर्चा सुरू आहे.


राज्यामध्ये २०१९ मध्ये मोठ्या राजकीय घडामोडीनंतर  महाविकास आघाडीची सत्ता आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय डावपेच आखून शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार सत्तेत आणलं. यावेळी राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये महत्त्वाचा दुवा म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काम पाहिलं.त्यामुळेच उपमुख्यमंत्री पदाची धुरा जयंत पाटील यांच्याकडे येईल अशी सर्वांना आशा होती. मात्र या उलट झाले.


पहाटेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सत्ता स्थापन करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांच महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. तेव्हा पासूनच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाराज आहेत असल्याची चर्चा सुरू होती.


आता पुन्हा एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांची राज्यात सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड झाली आहे. यावेळी विरोधी पक्ष नेतेपदावर  जयंत पाटील यांची वर्णी लागेल अशी चर्चा सुरू होती. मात्र पुन्हा एकदा अजित पवार यांनाच विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी देण्यात आली.  त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक जयंत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. मात्र या वाढदिवसाच्या पोस्टरवर कुठेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो दिसले नाहीत. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून पवार कुटुंबच गायब झाल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.


प्रतीक पाटील यांच्या अभिनंदनाच्या पोस्टरवर लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांचे पुत्र प्रतीक पाटील या तिघांचे फोटो सर्वत्र बघायला मिळाले. मात्र पवार कुटुंबियांचा यावर फोटो नसल्याचे चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील यांची नाराजी हेच याच्या मागचं कारण तर नाही अशी चर्चाही सध्या रंगू लागली आहे.