संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट
संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी मुलगी, भाऊ आणि आपल्या पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत असा धक्कादायक आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
Sanjay Nirupam allegations on Sanjay Raut: संजय राऊत (Sanjay Raut) खिचडी घोटाळ्याचे (Khichdi Scam) मुख्य सूत्रधार आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसने (Congress) पक्षातून निलंबित केलेले संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. त्यांनी मुलगी, भाऊ आणि आपल्या पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत असा धक्कादायक आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच त्यांनी अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान याच प्रकरणी उद्दव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना ईडीने (Enforcement Directorate) समन्स बजावले असून, चौकशीसाठी हजर झाले आहेत.
"राजकारणात कधीही कुटुंबाला खेचू नये. पण घोटाळा ज्याप्रकारे झाला आहे, त्यात त्यांचा उल्लेख करावा लागत आहे. संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पकडले गेल्यानंतर त्यांनी पत्नीच्या नावे लाच घेतल्याचं समोर आलं होतं. त्यांनी पत्नीला मधे आणायला नको होतं. खिचडी घोटाळ्यात त्यांनी मुलगी, भाऊ आणि आपल्या पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत," असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
"सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीत राजीव साळुखे, सुजीत पाटकर हे संजय राऊतांचे पार्टनर आहेत. कोविडमध्ये त्या कंपनीला 6 कोटी 37 लाखांची खिचडी पुरवण्याचं कंत्राट मिळालं होतं. या कंपनीतून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंब, मित्रांनी 1 कोटी रुपये दलाली म्हणून घेतले. बँकेतील खात्यातून मुलीच्या नावे संजय राऊतांनी चेकने लाच घेतली. 29 मे 2020 रोजी 3 लाख 50 हजार रुपये खात्यात आले होते. 26 जून 2020 रोजी 5 लाख रुपये मिळतात. 6 ऑगस्टला 1 लाख 25 हजार, 20 ऑगस्टला 3 लाखांचा एक चेक येतो. याचदरम्यान संजय राऊतांचे सख्खे भाऊ संदीप राऊत यांच्या खात्यावर 6 ऑगस्टला 5 लाखांचा चेक मिळाला," असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.
"35 रुपयात 300 ग्रॅम खिचडी पुरवठा कऱण्याचं कंत्राट सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीला मिळालं होतं. कोविडमध्ये सगळीकडे हाहाकार माजला होता. सगळं काही बंद पडलं होतं. अशावेळी हतबल लोकांना खिचडी पुरवण्याचा कंत्राट पालिकेने कंपनीला दिलं होता. पण नंतर 16 रुपयात 100 ग्रॅम खिचडी देण्याचं कंत्राट दिलं जातं. म्हणजे 200 ग्रॅम खिचडी चोरण्यात आली. म्हणूनच फक्त उमेदवार (अमोल कीर्तिकर) नाही, तर संजय राऊतही खिचडी चोर आहेत. त्यांनी पैसे खाल्ले आहेत. कंपनीत कदम नावाचा व्यक्ती नसताना, करारात मात्र त्याचाच उल्लेख आहे," असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
"तसंच स्वत:चं किचन नसताना जोगेश्वरीतील एस व्ही रोडवर असणाऱ्या पर्शियन दरबार रेस्तराँला आपलं किचन सांगण्यात आलं. कारवाई झाली तेव्हा पर्शियन दरबार रेस्तराँच्या मालकाला चौकशीसाठी बोलावलं जातं. त्याने आपल्याया याबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. म्हणजेच खिचडी पुरवठ्याचं कंत्राट मिळवण्यासाठी सह्याद्री रिफ्रेशमेंटने हा मोठा घोटाळा केला आहे," असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा सगळा घोटाळा झाला आहे. लोकांचा जीव जात असताना उद्धव ठाकरे गटाचे लोक गरिबांच्या हक्काच्या खिचडीत घोटाळा करत होते. ईडीने चौकशी वाढवावी आणि संजय राऊतांना अटक करावी. त्यांनी जी चोरी केली आहे ती अमानवीय आणि निर्दयी गुन्हा आहे," असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.