रामराजे शिंदे, अयोध्या - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे आणि वरूण सरदेसाई यांनी अयोध्येचा दौरा केला आहे. येत्या  १५ जूनला आदित्य ठाकरे अयोध्येच्या दौ-यावर जाणार आहेत. त्यापूर्वी सेनेचे नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे आणि वरूण सरदेसाई यांनी अयोध्येत जाऊन तयारीचा आढावा घेतला आहे. दरम्यान राऊत आणि शिंदे या दोघांनीही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. तसेच रामजन्मभूमीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. मागील काही दिवसात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अयोध्या दौ-याला प्राधान्याने दिले असल्याचे पाह्यला मिळते महाविकास आघाडीचं टेंपल रन कशासाठी चाललंय जाणून घेऊया या खास रिपोर्टमध्ये…


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचा अयोध्या दौरा का ?
आदित्य ठाकरे आपल्या दौ-याच्या माध्यमातून अयोध्येत शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे बृजभूषण सिंग यांचे नाव शरद पवार यांच्याशी मनसेनं जोडले आहे. मनसे अगोदरच शिवसेनेचा अयोध्या दौरा पार पडणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे शिवसेना हिंदुत्वा पासून दूर गेल्याचा दावा भाजप करत असल्याचे सातत्याने दिसते. हाच डाग पुसण्यासाठी शिवसेने अयोध्या दौरा करुन शिवसेना हिंदुत्व सोडले नसल्याचा संदेश अयोध्येतून देणार आहे.


महाविकास आघाडीचे टेंपल रन...
अयोध्या मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे कारण राज ठाकरेंना भाजप खासदार बृजभूषण सिंग यांच्याकडे होणारा विरोध. यानंतर राज ठाकरेंनी अयोध्या दौ-याची घोषणा केल्यानंतर मागोमाग आदित्य ठाकरे यांनी १० जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. परंतु राज्यसभा निवडणुकीमुळे तारीख पुढे ढकलून १५ जूनला आदित्य ठाकरे अयोध्येचा दौरा करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 


दरम्यान राष्ट्रवादीने सर्वात आधी बाजी मारली. आमदार रोहीत पवार यांनी आदित्य आणि राज ठाकरेंच्या आधीच अयोध्या आणि काशी विश्वनाथ दौरा केला. त्यानंतर शरद पवार यांनीही पत्रकार परिषदेत रोहीत पवार अयोध्येत गेल्याचं बोलून दाखवले होते. या दौ-यातून राष्ट्रवादीनं सॅाफ्ट हिंदुत्व स्विकारल्याचं दिसते.


मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही अयोध्या दौरा जाहीर करण्यामागचे कारण म्हणजे शिवसेनेकडून सुटत चाललेला हिंदुत्व मतदार आकर्षित करणे होते. ही पोकळी भरून काढण्यासाठी राज ठाकरे यांनी हनुमान चालिसेचा मुद्दा काढला. यानंतर लगेच अयोध्या दौ-याची घोषणाही राज ठाकरेंनी केली. उत्तर भारतीयांना मारहाण केल्याच्या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांना बृजभूषण सिंग यांच्याकडून विरोध वाढला. बृजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंच्या विरोधात रॅलीही काढली होती. दरम्यान शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे राज ठाकरेंनी तुर्तास तरी अयोध्या दौरा पुढे ढकलला आहे. परंतु मनसेच्या पदाधिका-यांनी अचानक अयोध्या दौरा करून बृजभूषण सिंग यांना आव्हान दिले होते.


दरम्यान एकीकडे राज्यसभा निवडणूकीत बहुमताचं गणित जुळवाजुळव सुरू असतानाच संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा केला. यावरून मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादीत टेंपल रन सुरू असल्याचे चित्र दिसते...