पवार-शाह भेट झाली का ? राऊत- आव्हाडांचे ट्वीट
शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात गुप्त बैठक झाल्याचे वृत्त एका गुजराती दैनिकाने दिले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ऊलटसुलट चर्चांना उधाण आले. राठोड, वाझे प्रकरणानंतर बॅकफूटवर गेलेल्या राज्यसरकारमध्ये नीट चालले नसल्याची चर्चा रंगू लागली. आणि राज्यात नवे समीकरण घडणार का ? असे प्रश्न विचारले जाऊ लागले. पण आता शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करुन यावर खुलासा केला आहे.
काही गोष्टी वेळच्यावेळी स्पष्ट व्हायला हव्यात. नाहीतर संभ्रम निर्माण होतो. शरद पवार आणि अमित शाह यांच्यात अहमदाबाद किंवा कुठेही कोणतीही भेट झाली नसल्याचे मी विश्वासाने सांगतो असे संजय राऊत म्हणाले. आतातरी अफवा पसरवू नका. काही हाती लागणार नाही असे राऊत म्हणाले.
शरद पवार आणि अमित शाह यांच्यात भेट झाली नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तरी काहीजण अफवा पसरवतात असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
अशाप्रकारची भेट राजकीय आहे असं म्हणता येत नाही. पण दोघे तिकडे होते असे पाटील म्हणाले. अशा गोष्टी जाहीरपणे सांगायच्या नसतात अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिली. अशी भेट झालीच नाही असं राष्ट्रवादीकडून सांगत आहेत. एवढ्या रात्री पवारांची का भेट घेतली ? मला कुठले संकेत मिळालेले नाहीत असे ते म्हणाले. काही सूचना वरिष्ठांकडून आली की मानायची असते. त्यामुळे अमित शाह आणि अध्यक्ष यांची भूमिका मान्य असेल असेही पाटील पुढे म्हणाले.