मुख्यमंत्री आणि खडसेंमध्ये राजकीय चर्चा- संजय राऊत
मुख्यमंत्री आणि खडसे यांच्यात नक्कीच राजकीय चर्चा झाली असेल असे राऊत यांनी स्पष्ट केले.
मुंबई : माझं तिकिट कापण्यामागे फडणवीस आणि महाजन असल्याचा गौप्यस्फोट भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. विधानसभा निवडणुकीपासून भाजपात नाराज असलेले खडसे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वृत्त समोर आले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांचा जास्त संपर्क झाल असेल ते एकाच जिल्ह्यातील आहेत. खडसे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटले होते. त्यांच्यात नक्कीच राजकीय चर्चा झाली असेल असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
मंत्रीपद वाटपात अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलले. त्यामुळे सत्ताधारी पक्षांत धुसपूस असल्याची चर्चा आहे. यावरही राऊत यांनी भाष्य केले. कुरबुरी फार नाहीयत, विस्तार झाला व आज खातेवाटप होईल. तीन पक्षात सरकार आहे, मोठे तालेवार लोक मंत्रिमंडळात असल्याचेते म्हणाले
शिवसेनेतील नाराजीच्या बातम्या फक्त मिडियातच आहेत. यापूर्वी अनेकांनी मंत्रिपदे भुषवली आहेत. सत्तेचा अमरपट्टटा कुणी घेवुन येत नाही. कधी कधी दुसऱ्यांसाठी रस्ता मोकळा करायचा असतो. आमच्या पक्षात तशी परंपरा असल्याचेही ते म्हणाले.
शब्द दिला असता तर तो पाळला असता. अनेक लोक बाहेरच्या पक्षातून आले. त्यांना उमेदवारी देवून जिंकून आणलं. मुळात तुम्ही तुमचा पक्ष सोडलात, कारण तुम्हाला तिथं जिंकून येण्याची खात्री नव्हती. युतीचे वारे होते म्हणून तुम्ही आलात. तुमचा मान सन्मान राखला गेला आणि ज्यांना शब्द दिला होता त्या अपक्षांना मंत्री केले असे म्हणत त्यांनी भास्कर जाधवांचा उल्लेख न करता भाष्य केले.
काँग्रेसकडील महसूल खातं हे ग्रामीण भागाशी निगडीत आहे. आरोग्य खातंही तसेच आहे. प्रत्येक खातं हे शहरी आणि ग्रामीण भागाशी संपर्क ठेवणारे असते. येत्या काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचेच वर्चस्व राहिल असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या संपर्कात असल्याची कबुली
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी शिवसेनेच्या संपर्कात असल्याची कबुली दिली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्याला संपर्क केला आणि आपणही शिवसेनेच्या संपर्कात होतो असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
महाजन-फडणवीस यांच्यावर निशाणा
आपलं तिकीट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच कापलं गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकनाथ खडसे यांनी उघडपणे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचं नाव घेत आरोप केले आहेत.