Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024, Sanjay Raut: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहचलेला असतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांचं वास्तव्य असलेल्या विक्रोळी आणि भांडूपमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं चांगलाच जोर लावल्याचं दिसत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मागील पाच दिवसांमध्ये विक्रोळीत दोन सभा घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या सभांमध्ये राज यांनी राऊतांवर तोंडसुख घेतल्याचं पाहायला मिळालं. राऊत यांनीही राज यांना तशास तसं उत्तर दिलं आहे. मात्र मंगळवारी झालेल्या राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. याच रिकम्या खुर्चीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता संजय राऊत यांनी थेट राज ठाकरेंवर त्यांच्या भाषेवरुन निशाणा साधला आहे.


मागील अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही सेनेंमधील संघर्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अधिक टोकाचा झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरे तर प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते असलेले राऊत पत्रकारांशी चर्चा करताना राज यांनी केलेल्या आरोप आणि दाव्यांना उत्तरं देत असल्याचं चित्र मागील दोन आठवड्यांमध्ये दिसून आलं. दरम्यान, मंगळवारी राज यांच्या विक्रोळी, भांडूपमधील उमेदवारांसाठी घेतलेल्या सभेत संजय राऊत अशी नावासहीत खुर्ची रिकामी ठेवण्यात आलेली. यावरच आता राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना खोचक प्रतिक्रिया नोंदवली आहे.


रिकामी खुर्ची का ठेवण्यात आलेली?


मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी संजय राऊत यांना राज ठाकरेंच्या जाहीर सभेचं आमंत्रण मनसे देत असल्याचं जाहीर करताना काल सभेच्या आधीच सभेत राऊतांच्या नावाने एक खुर्ची रिकामी सोडली जाईल, असं जाहीर केलं होतं. संजय राऊतांवर टीका करताना चव्हाण यांनी, "राऊतांच्या मेंदूला गंज लागलाय ते काहीही बोलतात," असं म्हटलं होतं. "राऊतांच्या मेंदूला गंज लागल्यामुळे राजकीय नेत्याने कसे बोलावे हे ऐकण्यासाठी त्यांना विक्रोळीतील मनसेच्या सभेला यावं असं निमंत्रण धाडण्यात आलं आहे," असं चव्हाण यांनी सांगितलं. "राजकीय विचार कसे असावेत व विचारांची देवाण घेवाण कशी असावी यासाठी त्यांना सभेला बोलावण्यात आलं आहे," अशा खोचक टोलाही चव्हाण यांनी या रिकाम्या खुर्चीसंदर्भात स्पष्टीकरण देताना लगावला होता. खरोखरच अशी खुर्ची राज ठाकरेंच्या मंगळवारच्या सभेत ठेवण्यात आलेली. या खुर्चीवर संजय राऊतांच्या नावाची पट्टीही लावण्यात आलेली. 


नक्की वाचा >> 'महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे गौतम अदानी'; राऊत म्हणाले, 'अजित पवारांना...'


रिकाम्या खुर्चीबद्दल राऊत काय म्हणाले?


संजय राऊत यांना राज ठाकरेंच्या सभेतील रिकाम्या खुर्चीवरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत चांगलेच संतापले. "राज ठाकरेंची भाषणं त्यांनी स्वत: पहावीत मग कळेल भाषा काय आहे ते," असा टोला राऊतांनी लगावला. तसेच पुढे भाषेवरुन बोलताना राऊत यांनी, "आम्हाला भाषा शिकवू नका. मराठी तर अजिबात शिकवू नका. आम्ही ज्या हेडमास्तरकडे शिकलो आहोत ना मराठी त्यानंतर मराठीचा कोणी हेडमास्तर झाला नाही. त्या हेडमास्तरचं नाव बाळासाहेब ठाकरे," असं म्हणत राज ठाकरेंवर निशाणा साधला.