शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठा दावा केला आहे. जालन्याच्या गेस्ट हाऊसमध्ये सुपारी देण्यात आली होती असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.  मनोज जरांगे या विषयावर बोलणार आहेत. पोलीस कारवाईत अनेक जण जखमी झाले. त्या घटनेला जे जबाबदार आहेत ते आता पुढं येऊ लागले आहेत, त्यातील एका आरोपीकडे पिस्तूल मिळालं आहे असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


"संजय राऊत जातीय दंगली घडणार असं म्हणाले होते. यासाठीच ते बोलले होते का? जालन्यात दंगल कशी घडेल याचा प्लॅन काही लोक आखत होते. त्यात राष्ट्रवादीचे काही लोक आणि संजय राऊतही होते. हा घटनाक्रम पाहता तातडीने त्यांचे बडे नेते आंतरवाली सराटी मध्ये दाखल कसे झाले?," अशी विचारणा संजय शिरसाट यांनी केली आहे. 



"शांततेने सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लावले त्या सगळ्या नेत्यांवर आता कारवाई होणार आहे. या नेत्यांच्या कटामुळे 2 समाजात तेढ निर्माण झालं आहे. ज्याच्याकडे पिस्तूल मिळाले तो तर मोहरा आहे. यांनी जे तातडीने स्पष्टीकरण दिले यावरून संशय बळावतो. या लोकांनी ही सगळी दंगल घडवली आहे. कारवाई व्हायला हवी म्हणून आम्ही अधिवेशनात आवाज उठवणार आहोत," अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे. 


ज्याच्याकडे पिस्तूल सापडली त्याला जालन्याच्या गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीनंतर सुपारी देण्यात आली होती असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. ते म्हणाले की, "उद्धव गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक यांनीच ही दंगल घडवली आहे. संजय राऊत यांना सगळं माहिती होतं. त्यांना जातीय तेढ निर्माण करायचं होतं. दंगल घडवून सरकारला बदनाम करण्याचा तो डाव होता. ज्याच्याकडे पिस्तूल सापडली त्याला जालन्याच्या गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीनंतर सुपारी देण्यात आली होती. अधिवेशनात आम्ही सगळे पुरावे, घटनाक्रम मांडू आणि सगळं उघड करू". 


"रोहित पवार काय म्हणतात ते उघड होईल. स्वतः करायचं आणि नामनिराळे व्हायचं. चौकशी मध्ये सगळं उघड होईल. मराठा ओबीसी नेत्यांनी आपापसात भांडू नये. कोणीही आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, यामुळे आपला विकास थांबेल," असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.