तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताऱ्यात (Satara Accident News) पोलिसांच्या (Satara Police) गाडीमुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. साताऱ्यातील कराड ढेबेवाडी मार्गावर पोलिसांच्या भरधाव गाडीने चौघांना उडवलं. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास आता पोलीस करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कराड ढेबेवाडी मार्गावर कुसूर गावच्या हद्दीत झालेल्या या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात 17 वर्षाचा सुजल कांबळे या युवकाचा मृत्यू झाला आहे. शंकर खेतमर हा पोलीस कर्मचारी ही अपघातग्रस्त गाडी चालवत होता. ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या दिशेला जाताना अपघात झाला. अपघातात एका दुचाकीचे आणि पोलिसांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.जखमीवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.


सुजल कांबळे याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. तर अपघातात आणखी तिघे तरुण जखमी झाले आहे. कराड – ढेबेवाडी मार्गावर रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हे चार तरुण रस्त्याच्या कडेला उभे राहून गप्पा मारत होते. त्याचवेळी कोळेवाडीकडून ढेबेवाडीकडे निघालेल्या भरधाव पोलीस गाडीने या तरुणांना उडवले. त्यातील सुजल कांबळे याचा जागीच मृत्यू झाला.


चंद्रपुरात दोन बाईकची समोरासमोर धडक; एक ठार दोन जखमी


चंद्रपूर शहरातील रामसेतू पुलावर भीषण अपघात झालाय. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक युवक ठार तर दोन जण जखमी झालेत. मृतामध्ये एमआयडीसी परिसरातील लहुजी नगरच्या 17 वर्षीय प्रथम चव्हाण याचा समावेश आहे. अपघातानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. तर जखमींवर उपचार सुरू आहेत. चंद्रपूर शहर व एमआयडीसीला जोडणाऱ्या रामसेतू पुलावर भरधाव वेगातील दुचाकीस्वारांच्या वेगामुळे अपघातात वाढ होत आहे.