तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताऱ्यातून (Satara Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चारचाकी आणि आयशर ट्रकमध्ये झालेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात बहिण भावासह त्यांच्या भाच्याचाही मृत्यू झाला आहे. पुणे - बंगळुरु महामार्गावर (pune bangalore highway) ही दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात इतकी भीषण होता की ट्रकला धडक दिल्यानंतर गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी (Satara Police) घटनास्थळी धाव घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे - बंगळुरु महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे चारचाकीने रस्त्यावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या भीषण अपघातामध्ये कारमधील बहिण, भाऊ आणि भाचा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांतील तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. मनीषा आप्पासाहेब जाधव आणि नितीन बापूसाहेब पोवार (रा. कोल्हापूर राजवाडा) आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव अशी मृतांची नावे आहेत. मृतांमधील भाऊ नितीन पोवार हे कोल्हापूर येथील पोलीस कर्मचारी आहेत.


पोलिसांची दिलेल्या माहितीनुसार पुणे-बंगळूरु महामार्गावर कऱ्हाड जवळील पाचवड फाटा येथे दुपारी दीडच्या सुमारास चारचाकी गाडी (एमएच 01 एल 4558) ही कार कोल्हापुरकडुन मुंबईकडे निघाली होती. त्यादरम्यान चारचाकीने आयशर ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. या भीषण धडकेत चारचाकी गाडीचा पुढील भाग हा ट्रकच्या पाठीमागील भागात घुसला. त्यामध्ये चारचाकीतील तिघांचाही मृत्यू झाला आहे.


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले होती. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे पुणे-बेंगळुरु महामार्गावरील वाहतुक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त कार बाजूला काढून वाहतूक पुर्ववत करण्याचे काम सुरु केलं आहे.