साताऱ्यात चोरट्यांचे पोलिसांना आव्हान; एकाच रात्रीत 24 घरांवर दरोडा
Satara Crime : साताऱ्यात एकाच रात्री 24 घरफोड्या झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई तालुक्यातील चार गावांमध्ये ही चोरीची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासकार्य सुरु केले आहे. मात्र या घटनेमुळे गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताऱ्यातील (Satara Crime) वाई तालुक्यात पसरणी, कुसगांव, ओझर्डे, सिद्धनाथवाडी येथे एकाच रात्रीत 24 बंद घरे फोडून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला आहे. एकाच रात्री चार गावांमध्ये झालेल्या घरफोड्यांमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सोने आणि रोख रकमेसह लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. एकाच वेळी 24 घरांमध्ये चोरी करून चोरट्यांनी सातारा पोलिसांनाच (Satara Police) आव्हान दिल्याचे म्हटलं जात आहे. महत्वाचे म्हणजे ही सर्व 24 घरे बंद होती. या बंद घरांची कुलपे तोडून मोठा ऐवज लंपास करण्यात आला आहे.या घटनेमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाई तालुक्यात शुक्रवारी रात्री चोरट्यांनी पसरणी, कुसगांव, ओझर्डे, सिद्धनाथवाडी या गावांमध्ये धुमाकूळ घातला होता. चोरट्यांनी एकाच रात्रीत 24 बंद घरांची कुलूपे घरे तोडून सोने व रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत याप्रकरणातील फक्त गुन्ह्यांची नोंद करण्याचेच काम सुरु होते. दुसरीकडे या चोरीच्या घटनांमुळे चारही गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवारी मध्यरात्री पसरणी गावात 11, कुसगांव येथे चार, ओझर्डे येथे पाच तर सिद्धनाथवाडी येथे चार अशा 24 बंद घरांची कुलपे तोडून दरोडा टाकण्यात आला. चोरट्यांनी या घरांमधील सोने व रोख रकमेसह मोठा ऐवज घेऊन पोबारा केला. चोरट्यांच्या भक्षस्थानी पडलेली घरे ही बंद होती. या घरांमधील लोक हे कामानिमित्त पुणे, मुंबई येथे वास्तव्यास आहेत. अशाच घरांना हेरून चोरट्यांनी लक्ष्य केले आणि एका रात्रीत एवढी मोठी चोरी केली.
पुण्यात पोलिसांनी परत मिळवले 13 तोळे सोने
घरफोडीचा गुन्हा उघड करत तब्बल सात लाख किमतीचे 13 तोळे सोन्याचे दागिने लोणीकंद पोलिसांनी हस्तगत केले आहेत. कोणताही सबळ पुरावा नसताना लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड केला आहे. पोलिसांनी या कारवाईत तब्बल सात लाख किमतीचे 13 तोळे सोन्याचे दागिने केले ताब्यात घेतले आहेत. लोणिकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे,सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्या पथकाने गुन्हा उघड करत आरोपी चंद्रकांत (उर्फ चंद्या) अनंत माने व आरोपी प्रमोद उर्फ पप्पू पाटोळे यांना मुद्देमालासह अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने आठ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तर कोर्टाच्या आदेशानुसार तक्रारदार महिलेला सोने वितळून मिळवलेला मुद्देमाल परत देण्यात येणार आहे.