तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : रविवारी झालेल्या दोन धक्कादायक घटनांनी संपूर्ण सातारा (Satara News) जिल्हा हादरला आहे. रविवारी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात गोळीबाराची (Satara Crime) घटना घडली. पाटण तालुक्यात झालेल्या या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आणखी एका धक्कादायक घटना समोर आली आहे. साताऱ्याताली कोरेगाव (koregaon) येथे दोन तरुणांनी आत्महत्या करत स्वतःला संपवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन युवकांनी रुममध्ये रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार समोर आल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.


रविवारी रात्रीच्या सुमारास कोरेगाव तालुक्यात हा सर्व प्रकार घडला आहे. दोन तरुणांना उचलेल्या या टोकाच्या पावलामुळे वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. यातील एका तरुणाने स्वतःला पेटवून घेत संपवले आहे. तर दुसऱ्या तरुणाने गळफास घेत आत्मत्या केली आहे. मात्र दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. महत्त्वाची बाब म्हणजे दोघेही तरुण हे बाहेरच्या राज्यातील आहेत. कोरेगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


दरम्यान, रविवारी पाटण तालुक्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पाटण तालुक्याच्या मोरणा विभागातील शीद्रुकवाडी येथे हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. गुरेघर धरण परिसरात गोळीबार झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी ठाण्याती माजी नगरसेवक मदन कदम यांना ताब्यात घेतलं आहे. पवनचक्कीच्या पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. जुना वाद मिटवण्यासाठी बोलणी सुरू असताना पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात मदन कदम याने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे.