तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : डॉक्टरांच्या मारहाणीमुळे साताऱ्याच्या  (Satara News) कोरेगाव तालुक्यातील एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूक झाल्यानंतर तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने एक चिठ्ठी देखील लिहीली होती. पोलिसांनी (Satara Police) याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत मृताच्या कुटुंबियांनी तरुणाचा मृतदेह पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवला होता. पोलिसांनी समजूत घातल्यानंतर तरुणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशिकांत चंद्रकांत बोतालजी असे मृत तरुणाचे नाव असल्याचे समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी शशिकांतने लिहिलेल्या चिठ्ठीत डॉक्टरांनी संगणमत करून 14 लाख रुपयांची अफरातफर केली असल्याचा आरोप शशिकांतने केला आहे. संबंधित डॉक्टरांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी युवकाचा मृतदेह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींना अटक झाल्याशिवाय शशिकांतचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेत मृतदेह कोरेगाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवला होता. आरोपींवर गुन्हा झाल्या नंतर मृतदेह पोलीस ठाण्यातून नेण्यात आला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


शशिकांत हा एका हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्याच्या खात्यावर डॉक्टरांनी कर वाचवण्यासाठी 6 लाख 10 हजार रुपये पाठवले होते. तसेच जबरदस्तीने घराची नोटरी करून घेत डॉक्टरांनी नावावर करून घेतले होते. हे करत असताना डॉक्टरांकडून या युवकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या मारहाणीला आणि दबावला कंटाळून युवकाने चिट्ठी लिहून ठेवत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात डॉक्टर सुहास चव्हाण, डॉ गणेश होळ आणि गोपाळ साळुंखे यांना अटक करण्याची मागणी शशिकांतच्या कुटुंबियांनी केली आहे.


"आरोपींना अटक करा"


"शशिकांत बोतालजी याने विष प्राशन केले होते. त्याच्याजवळ सापडलेल्या तीन पानांच्या चिठ्ठीमध्ये त्याच्यासोबत घडलेली प्रसंग त्याने लिहीला आहे. रुग्णालयात काम करत असताना कर वाचवण्यासाठी त्याच्या खात्यामध्ये पैसे वळते केले आणि त्याच्यावर 14 लाखांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला. त्याला मारहाण करुन त्याच्याकडून सहा लाख रुपये घेतले. त्यांचे घरही स्वतःच्या नावावर करुन घेतले. या दबावापोटी शशिकांतने आत्महत्या केली. हे सर्व त्याने चिठ्ठीमध्ये लिहीले आहे. या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी आहे, असे शशिकांतचे मामा मारुती बोबाटे यांनी म्हटले आहे.


"तक्रारदार चंद्रकांत बोतालजी यांनी त्यांचा मुलगा शशिकांत याने केलेल्या आत्महत्येबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली.