सातारा: पाटण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई आणि पाटणच्या महिला पोलीस अधिकारी तृप्ती सोनावणे यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आहे. शंभूराज देसाई शुक्रवारी विजयी उमेदवार प्रमाणपत्र घेऊन पाटणला गेले असताना एका व्यक्तीने शंभूराज देसाई यांच्याविषयी अपशब्द वापरले. त्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्याने त्या व्यक्तीला मारहाण करायला सुरुवात केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सगळा पाहिल्यानंतर पाटणच्या महिला पोलीस अधिकारी तृप्ती सोनावणे यांनी या दोघांना ताब्यात घेतले. संबंधित व्यक्ती शिवीगाळ करत असताना पोलीस प्रशासन गप्प का राहिले? असा प्रश्न आमदार देसाई विचारत होते. परंतु पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे महिला पोलीस अधिकारी तृप्ती सोनावणे सांगत होत्या. पण माझ्या कार्यकर्त्याला का ताब्यात घेतले असा जाब शंभूराज देसाई वारंवार विचारत होते. या दोन्ही कार्यकर्त्यांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


मात्र, संबंधित आमदारांनी एका महिला अधिकाऱ्याला या भाषेत बोलणे कितपत योग्य आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.