उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार का?
आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार का, याची चर्चा पुन्हा सुरू
सातारा : आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार का, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांचा एकत्र प्रवास. साताऱ्यातलं राजकारण कसं रंगतंय, एक रिपोर्ट.
फसवाफसवी करू नका फक्त... नाही तर आम्हालाही कळतं, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले, यांनी २२ सप्टेंबर २०१८ रोजी दिला होता. त्यानंतर पवार यांनी त्यांच्या उमेदवारीला कोणाचा विरोध नाही, असे सांगत बदलातील हवाच काढू टाकली होती. दरम्यान, सध्या वेगळेच चित्र दिसत आहे. उदयनराजेंना जी शंका होती, तीच बहुदा खरी ठरणार असं दिसतंय. शरद पवार त्यांची फसवाफसवी तर करणार नाहीत ना..?
साताऱ्यातून खासदार उदयनराजेंना पुन्हा उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांचा विरोध आहे. उदयनराजे विरूद्ध बाकीचे नेते असं चित्र साताऱ्यात आहे. त्यातच राज्यपालपदाची मुदत संपल्यानंतर माजी खासदार श्रीनिवास पाटील पुन्हा राजकारणात सक्रीय झालेत.
गुरूवारी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि श्रीनिवास पाटील एकाच गाडीतून आल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. श्रीनिवास पाटील स्वतः देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. खरं तर साताऱ्याच्या विश्रामगृहात गेल्या २२ सप्टेंबरला पवार आणि उदयनराजेंची जी भेट झाली, तेव्हाच सगळं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं होतं. पवार इतर नेत्यांना भेटण्यासाठी थांबले तेव्हा उदयनराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांना इशारा करून काढता पाय घेतला होता.
शरद पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय, याचा थांग पता लागणं अवघड आहे. उदयनराजे की श्रीनिवास पाटील याचा फैसला होईलच. पण राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नाही तर उदयनराजे काय करणार, याकडं आता सगळ्याचं लक्ष लागले आहे.