अमर काणे, झी मीडिया, नागपूर : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. सतीश चतुर्वेदी यांना पक्षविरोधी कारवायांसाठी शहर काँग्रेसनं बजावलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी दिलेली एक आठवड्याची मुदत संपली होती. तरीही त्यांनी कोणतंही उत्तर न दिल्याने, त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.


अखेर निलंबनाची कारवाई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवडा झाला तरीही नोटीसीला उत्तर नसल्यामुळे चतुर्वेदींवर काँग्रेसमधून निलंबनाची कारवाई अटळ दिसत होती. महापालिका निवडणुकीत काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली होती. पक्षाच्या अधिकृत  उमेदवाराविरुद्ध अनेक बंडखोर उमेदवार उभे करण्यात आले होते. या बंडखोरांना चतुर्वेदींनी पाठबळ दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.


पक्षविरोधी काम भोवलं


पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवल्यानंतर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी त्यांना नोटीस बजावली होती. नागपूर शहर काँग्रेसमध्ये माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार विरुद्ध माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत, अनिस अहमद यांच्यात वाद आहे.