नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येच्या तपासाला शब्दशः कुलूप लागले आहे. सीबीआयच्या दिल्ली स्थित क्राईम ब्रान्चकडे सध्या हा तपास आहे. पण, मागील वर्षभरापासून या तपासाला कुलूप लागले आहे. सीबीआयचे तपास पथक पुण्यातील पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊसमध्ये उतरलं होतं. साधारण वर्षभरापूर्वी हे तपास पथक दोन सूटला कुलूप लावून गायब झालं आहे.


दोन सूट टाळेबंद...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातलं पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊस सदैव हाऊस फुल्ल असतं. सरकारी अधिकारी - कर्मचारी, आमदार - खासदार, न्यायाधीश अशा पाहुण्यांची या ठिकाणी मोठी वर्दळ असते. पण या गेस्टहाऊस मधील २ आणि १८ नंबरच्या दोन सूटला वर्षभरापासून बंद आहेत. नूतनीकरण किंवा दुरुस्तीसाठी हे सूट बंद नाहीत. इथं कोणी राहतही नाही. तरीही पीडब्ल्यूडी हे सूट कोणाला देत नाहीत. विशेष म्हणजे पीडब्ल्यूडीची इच्छा असूनही त्यांना हे सूट देता येत नाहीत. कारण, एका पाहुण्याने या दोन सूटला स्वतःची कुलूपं लावलीत. ती उघडण्याची हिंमत पीडब्ल्यूडीचीदेखील नाही.


सीबीआय अधिकारी कुठे गेले?


पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊसच्या या दोन सूटला कुलूप लावलंय ते सीबीआयने... सीबीआयनंच कुलूप लावल्यानं हे सूट अनेक महिने बंद असले तरी ते उघडण्याची पीडब्लूडीची तयारी नाही. तळेगाव येथील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येच्या तपास सीबीआयच्या दिल्ली येथील क्राईम ब्रान्चकडे आहे. तपासासाठी हे पथक पुण्यात आल्यावर ते या ठिकाणी थांबते. पण, जवळपास मागील वर्षभरापासून सीबीआयचे तपास अधिकारी इकडे फिरकलेलेच नाहीत.


कुठवर आलाय शेट्टी हत्येचा तपास?


सूटला मागणी आहे. सूट रिकामे देखील आहेत. पण तरीही ते कोणाला देता येत नाहीत एव्हडीच पीडब्ल्यूडीची अडचण नाही. तर, या सूटचं भाडंही सीबीआयने भरलेलं नाही. सतीश शेट्टी हत्येचा तपास कसा चालला आहे. तपास यंत्रणा किती गंभीर आहेत. याचा प्रत्यय द्यायला हे उदाहरण पुरेसं आहे. सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणात अनेक बडी नावं संशयाच्या भोवऱ्यात आहेत. आयआरबीचे विरेंद्र म्हैसकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना सीबीआयने अधिकृतरीत्या संशयित ठरवलेलं आहे. अशा बड्या नावांमुळेच तपास यंत्रणा चालढकल करत आहेत. असा आरोप संदीप शेट्टी यांनी केला आहे.  


सतीश शेट्टी यांच्या हत्येला सात वर्ष होत आलीत. या सात वर्षातील साडे सहा वर्ष तपास सीबीआयकडे आहे. तरीही , मारेकरी सापडलेले नाहीत. सीबीआयचा असा कुलूप बंद तपास सुरु असेल तर, हा तपास पूर्णत्वास जाईल याबाबत शंकाच आहे.