प्रदेश युवक काँग्रेस निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजित तांबे हे सर्वाधिक मते प्राप्त करीत प्रदेशाध्यक्ष पदावर निवडणून आले आहेत तर त्या पाठोपाठ...
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सत्यजित तांबे हे सर्वाधिक मते प्राप्त करीत प्रदेशाध्यक्ष पदावर निवडणून आले आहेत तर त्या पाठोपाठ आमदार अमित झनक हे दुसऱ्या क्रमांकाची मते प्राप्त करीत उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. माजी मंत्री नितीन राउत यांचे चिरंजीव कुणाल राउत हे उपाध्यक्ष पदावर निवडून आले आहेत.
या निवडणुकीच्या माध्यमातून ६० सदस्यांची प्रदेश कार्यकारिणी देखील निवडण्यात आली आहे. सत्यजित तांबे यांना ७० हजार १८९ मते मिळाली. आमदार झनक यांना ३२ हजार ९९९ मते तर कुणाल राउत यांना ७ हजार ७४४ मते मिळाली. ९,११ व सप्टेंबरला पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल यापूर्वी पुणे येथे जाहीर करण्यात येणार होता मात्र दोन दिवसांपूर्वी हा निकाल नागपुरातील काँग्रेसच्या देवडिया भवन येथे जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
निकालानंतर युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांचे स्वागत केले. नवनिर्वाचित युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. दरम्यान युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी राजकीय कुटुंबातीलच उमेदवार निवडून आले असले तरी ही घराणेशाही नसल्याच काँग्रेस नेते सांगत आहेत. घराणेशाही संपवण्यासाठीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या निवडणुका जाहीर केल्या होत्या त्यामुळे सर्वांना निवडणूक लढवण्याची आणि त्यात विजय मिळवण्याचा अधिकार मिळाला असल्याच काँग्रेस नेते राहुल ठाकरे यांनी सांगितले.