`ईडी झालीय येडी; मालकाचं ऐकून काहीही करु लागलीय`
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर `ईडी`कडून करण्यात आलेली ही कारवाई राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी 'ईडी'च्या कारवाईवर टीका केली आहे. सत्यजित यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ईडी झालीय 'येडी'! मालकाचं ऐकून काहीही करु लागलीय.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 'ईडी'कडून करण्यात आलेली ही कारवाई राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हा घोटाळा २५ हजार कोटींचा असल्याचे ईडीने म्हटले आहे. सहकारी बँकेचे आर्थिक स्थितीत कमकुवत असतानाही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. कर्ज वाटप करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता होती, असा ठपका 'ईडी'ने ठेवला आहे.
तसेच सहकारी साखर कारखाने आजारी पडल्यानंतर चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्यासाठी अतिशय कमी किमतीत विकली गेल्याचे 'ईडी'ने म्हटले आहे. सहकारी साखर कारखाने काही विशिष्ट राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईकांना विकल्या गेल्याचा दावाही ईडीने केला आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी हे सर्व आरोप नाकारले आहेत. मी कधीही राज्य सहकारी बँकेचा सभासद किंवा संचालक नव्हतो. तसेच बँकेच्या आर्थिक देवाणघेवाणीतही माझा कोणताही संबंध नव्हता, असे त्यांनी सांगितले.
तसेच त्यांनी 'ईडी'च्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय कायम न ठेवता पुन्हा निपक्षपातीपणे चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, 'ईडी'ने चौकशीपूर्वीच गुन्हा दाखल केला, असे शरद पवार यांनी 'झी २४ तास'ला सांगितले.