मुंबई : सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत अभाविप प्रणित एकता पॅनेलनं विजय मिळवला आहे. मुख्यमंत्र्यांचे बंधु प्रसेनजित फडणवीस हे देखील या निवडणूकीत विजयी झाले आहेत. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पार पडलेल्या निवडणुकीत यंग टीचर्स एसोसिएशनने आपले वर्चस्व सिद्ध करत सिनेटच्या १९ पैकी १० जागांवर विजय प्राप्त केलाय. 


पुणे निकाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पदवीधर गटातील १० पैकी ८ तर व्यवस्थापन गटातील ५ पैकी २ जागा जिंकत एकता पॅनेलनं विरोधी प्रगती पॅनेलवर आघाडी घेतलीय. व्यवस्थापनच्या ५ तर पदवीधरच्या १० जागांसाठी ही निवडणूक झाली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीत एकता पॅनेलला एकूण १० तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे आघाडी प्रणित प्रगती पॅनेलला एकूण ५ जागांवर विजय मिळालाय. 



अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बिनविरोध


या निवडणूकीत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या प्रगती पॅनेलच्या उमेदवार होत्या. त्या आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे बंघु प्रसेनजित फडणवीस हेदेखील पदवीधर गटातून एकता पॅनेलचे उमेदवार होते. त्यांच्या उमेदवारीनं ही निवडणूक लक्षवेधी बनली होती. पदवीधरच्या खुल्या गटातून निवडून येण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. अखेर शेवटच्या फेरीत ते विजयी झाले.


नागपूर निकाल


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पार पडलेल्या निवडणुकीत यंग टीचर्स एसोसिएशनने आपले वर्चस्व सिद्ध करत सिनेटच्या १९ पैकी १० जागांवर विजय प्राप्त केलाय. तर सेक्युलर पॅनलला ७ आणि शिक्षण मंचला २ जागांवर विजय मिळवता आलाय. सिनेट, विद्वत परिषद आणि अभ्यास मंडळाच्या पार पडलेल्या निवडणुकीत ९२ टक्के मतदान झालं होतं. 



तब्बल ७ वर्षांनी निवडणूक


तब्बल सात वर्षानंतर झालेल्या नागपूर विद्यापीठाच्या या निवडणुकीत सिनेट, विद्वत आणि अभ्यास मंडळाच्या प्रत्येक गटासाठी सेक्युलर पॅनल, यंग टीचर्स असोसिएशन आणि शिक्षण मंचाने निवडणुकीच्या रिंगणात आपले उमेदवार उतरवले होते. मात्र सर्वच गटात यंग टीचर्स एसोसिएशनने बाजी मारत आपलं वर्चस्व स्थापन केलं.