मुंबई: महाराष्ट्र सरकारने सुरु केलेला ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम म्हणजे निव्वळ थोतांड आहे, अशी टीका करणाऱ्या अभिनेते सयाजी शिंदे यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. मी रागाच्या भरात तशी प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यामुळे ग्रामसेवकांबद्दल समाजात चुकीचा संदेश गेला. यासाठी मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे सयाजी शिंदे यांनी व्हॉटसअप मेसेजमध्ये म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे यांनी हा मेसेज ग्रामसेवक राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे यांना पाठवला होता. ग्रामसेवक मित्रांनो एका ठिकाणची परिस्थिती पाहून रागाच्या भरात मी एका वाहिनीवर प्रतिक्रिया दिली. त्यातून ग्रामसेवकांबद्दल चुकीचा संदेश गेला. आपण सगळे उत्तम काम करता. यापुढे कधीच शासकीय कर्मचारी आणि व्यवस्थेवर बोलणार नाही. तुम्ही एकदा म्हणाला मी दहादा दिलगिरी व्यक्त करतो. तुमचे काम अप्रतिम आहे. माझ्या बोलण्यात गडबड झाली. तुमच्या भावी कार्याला शुभेच्छा, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे. 


काही दिवसांपूर्वीच सयाजी शिंदे यांनी राज्य सरकारच्या वृक्ष लागवड कार्यक्रमाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आपण यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही भेट घेतली होती. या उपक्रमातंर्गत शिक्षणसंस्थांमध्ये गुलमोहर, सुबाभळ या वृक्षांचीच लागवड केली जाते. दरवर्षी त्याच खड्ड्यात जाऊन झाडे लावली जातात. मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना वृक्षांच्या साध्या जातीही माहिती नाही. त्यामुळे ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम म्हणजे निव्वळ थोतांड असल्याची टीका सयाजी शिंदे यांनी केली होती.