जळगाव : सोने व्यापारातील मोठे नाव जळगावचे राजमल लखीचंद ज्वेलर्सचे सर्वेसर्वा ईश्वरलाल जैन यांना स्टेट बँकेने शंभर कोटींपेक्षा ही अधिक कर्जवसुली नोटीस काढली आहे, ही नोटीस वृत्तपत्रात छापून आली आहे. तसेच सोशल मीडियावर ही नोटीस व्हायरल होत आहे. कारण ज्यांची सोन्याची पेढी संबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, त्यांना कर्जाची नोटीस आल्याने लोकांसाठी ही निश्चितच आश्चर्यकारक बाब आहे. ईश्वरलाल जैन यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी असलेले कर्ज वारंवार नोटीस देऊनही दिले जात नाही, म्हणून वृत्तपत्रात जाहिराती देण्यात आल्या असल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवेगळ्या फर्मच्या नावाने घेण्यात आलेल्या कर्जाचं हे प्रकरण गेल्या पाच ते सात वर्षांपासून सुरू आहे. मात्र बँकांमधील अनेक घोटाळे समोर येत असताना आता सर्वच बँकांवर वसुलीचा दबाव वाढतो आहे, त्यामुळे मोठे कर्जदार आणि थकबाकीदार असलेल्या उद्योजकांवर थकबाकी भरण्याबाबत दबाव करण्यास सुरुवात झाली आहे.


राजमल लखीचंद या फर्मचे सर्वेसर्वा ईश्‍वरलाल जैन हे राष्ट्रवादीचे माजी खजिनदार, तसेच राज्यसभेचे खासदार ही होते. राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या एका नेत्याचं हे प्रकरण समोर आल्याने पुन्हा एक खळबळ उडाली आहे. 



राजमल लखीचंद या फर्मचे सर्वेसर्वा ईश्वरलाल जैन यांनी स्टेट बँकेच्या कर्जाबाबत कबुली दिली आहे. मात्र त्यांचेही काही घेणे असल्यामुळे समझोता आपआपसात सुरू असल्याचे यावेळी ईश्वरलाल जैन यांनी स्पष्ट केले आहे.