भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी होणार - मुख्यमंत्री
भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेची चौकशी होणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यातील विविध शहरात बघायला मिळत आहेत.
मुंबई : भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेची चौकशी होणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यातील विविध शहरात बघायला मिळत आहेत.
काय म्हणाले सीएम?
भीमा कोरेगाव प्रकरणी हायकोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोरेगाव-भीमा हिंसाचारात मृत पावलेल्या युवकाच्या हत्येची सीआयडी चौकशी होणार असेही ते म्हणाले. तसेच या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली. तसेच सोशल मीडियातून अफवा पसरवणा-यांवरही कारवाई केली जाणार आहे. काही जणांना नुकसान भरपाई सुद्धा दिली जाईल असे ते म्हणाले.
काय आहे प्रकरण?
समाजकंटकांनी घातलेल्या या राड्यात काहीजण जखमी झाले आहेत तर एका तरुणाचा मृत्यू झालाय. तसेच ३० ते ४० वाहनांचं नुकसान झालय. भीमा कोरेगावच्या ऎतिहासिक लढाईच्या द्विशतक पूर्तीनमित्त इथल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय तिथे जमला होता. या पार्श्वभूमिवर नगर रोड परिसरात हा राडा झाला.
अफवांवर विश्वास ठेऊ नये
रात्री उशिरापर्यंत परिसरात भितीचं तसेच तणावाचं वातावरण होतं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येनं पोलिस बळ तैनात करण्यात आलय. सध्या त्याठिकाणी शांतता असून जनतेनं अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आलय.
शरद पवार यांची प्रतिक्रिया
भीमा कोरेगाव प्रकरणा मागे पुण्यातील हिंदुत्व वादी संगठाणांनी तीन ते चार दिवस आधी चिथावणी दिल्याची स्थानिक ग्रामस्थांची माहिती आहे. जे काही घडलं आहे त्याची चौकशी राज्य सरकार आणि पोलिसांनी करावी. घडलेला प्रकार चांगला नाही त्यामुळे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यानी आगीत तेल टाकावे अशी भाषा करू नये, असे ते म्हणाले.