Maharashtra Rain: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना रविवारी मुसळधार पावसाने झोडपलं आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे यासह अनेक शहरांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे सखोल भागात पाणी साचलं असून रस्त्यांसह रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दुसरीकडे ग्रामीण भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार आणि पूर परिस्थिती पाहता उद्या (22 जुलै 2024) जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयं बंद राहणार असल्याचं जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूरच्या चिचपल्लीत गावतलाव फुटल्याने 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरलंय. सलग 2 दिवस पाऊस झाल्याने तलावाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. आज पहाटे तलाव फुटून पाणी गावात शिरलं. घरातील सामानाचं, धान्याचं आणि संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं. यात ४० बक-याही दगावल्या आहेत. 


चंद्रपुरात शहरालगतच्या इरई धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सर्व 7 दारं आता 0.5 मीटरने उघडली आहेत. मात्र वर्धा नदीत पाणी कमी असल्याने इरई नदीतील पाणी वेगाने जात आहे. दरम्यान महाराष्ट्रात इतर ठिकाणी काय स्थिती आहे जाणून घ्या.


धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेले 40 ते 50 जण अडकले


नवी मुंबईतील बेलापूर येथील आर्टिस्ट कॉलनीच्या मागील बाजूस असणाऱ्या डोंगरात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेले 40 ते 50 जण अडकले. मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटक अडकले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दल, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सध्या रेस्क्यू ऑपेरेशन सुरु आहे. दोरखंडाच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं.


 मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, अंजणारी ब्रिजवरील वाहतूक थांबवली


रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी ब्रिजवरील वाहतूक थांबवली आहे. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने सुरक्षितता म्हणून वाहतूक थांबवण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी ब्रिज  हा ब्रिटिशकालीन आहे.


सावित्री नदीचे पाणी धोका पातळीवर, पालिकेकडून सतर्कतेचा इशारा


रायगडच्या महाडमधील सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या नदीचे पाणी धोका पातळीवर गेलं असून नगर पालिकेकडून भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफच्या पथकाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाबळेश्वर आणि घाट माथ्यावरील मुसळधार पावसाचा महाडला फटका बसला आहे. महाबळेश्वर इथे सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 145 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पोलादपूरमध्ये 102 तर महाडमध्ये 62 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.


डहाणूला पावसाने झोडपलं, नागरिकांची उडाली तारांबळ


पालघरमध्ये मुसळधार पावसाने डहाणूला झोडपलं. डहाणूच्या सागर नाका आणि इराणी रोड परिसरात पाणीच पाणी साचलं . डहाणूत अनेक ठिकाणी सखलभागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. डहाणूसह परिसरात अजूनही पावसाची संततधार सुरुच आहे.