अयोध्येत बाबरी मस्जिद पुन्हा उभारणार, मुस्लीम संघटनेचा दावा
एसडीपीआय ६ डिसेंबर रोजी दिल्लीत बाबरी मशिदीच्या हक्कासाठी रॅली काढणार
अयोध्या : उत्तरप्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणाच्या मागणीदरम्यान एका मुस्लीम संघटनेनं अयोध्येत २५ लाख लोक जमवण्याचा दावा केलाय. मुस्लीम संघटनेच्या म्हणण्यानुसार जर विश्व हिंदू परिषदेनं अयोध्येत पाच लाख लोक जमा केले तर आपण २५ लाख लोक जमवून दाखवू शकतो. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेनं हा दावा केलाय.
सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) या संघटनेच्या म्हणण्यानुसार, अयोध्येत पाच नाही तर २५ लाख लोक आम्ही जमवून दाखवू शकतो. मंगळवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं. एसडीपीआयच्या म्हणण्यानुसार, त्यांनी कधीही बाबरी मशिदीवरचा ताबा सोडलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बाबरी मशिद उभी राहणार... त्यासाठी कायदेशीर लढाई सुरू राहिलं. एसडीपीआय ६ डिसेंबर रोजी दिल्लीत बाबरी मशिदीच्या हक्कासाठी रॅली काढणार आहे.
यावेळी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केलीय. पंतप्रधान राजधर्माचं पालन करत नाहीत. ते आरएसएसच्या प्रचारकाप्रमाणे वक्तव्य करत आहेत. अलवरमध्ये त्यांनी न्यायालयावर उपस्थित केलेलं प्रश्नचिन्ह तसा इशारा देतंय, असं तस्लीम रहमानी यांनी म्हटलंय.
बाबरी मस्जिद बनवण्याचा आमचा दावा कायम आहे आणि राहील. माजी पंतप्रधान नरसिम्हा राव यांनी बाबरी मशिद बनवण्याचं वचन दिलं होतं, असंही त्यांनी म्हटलंय.