Guillain Barre Syndrome Second Death In Maharashtra: राज्यामध्ये दुर्मिळ गिया बार्रे सिंड्रोममुळे (जीबीएस) दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुण्यात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात राहत असलेल्या 56 वर्षीय महिलेने गिया बार्रेमुळे जीव गमावला आहे. मृत महिला कॅन्सरग्रस्त होती. 15 जानेवारीला तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच तिने जीव गमावला असून, यामुळे गिया बार्रेचं गांभीर्य वाढलं आहे. याआधी पुण्यातील तरुणाचा सोलापूर येथे मृत्यू झाला आहे. 


पहिला मृत्यूही पुण्यातच 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातून सोलापुरात दाखल झालेल्या तरुणाचा 25  जानेवारीला जीबीएसमुळे मृत्यू झाला. हा रुग्ण 40 वर्षांचा होता. त्याला पुण्यात असतानाच जीबीएसची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल झाला होता. 18 जानेवारी रोजी सर्दी, खोकला आणि श्वसनास त्रास होत असल्याने या रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला या रुग्णाला अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्याला साध्या रुममध्ये हलवण्यात आलेलं. मात्र अचानक शनिवारी (25 जानेवारी रोजी) त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला.


महाराष्ट्रावर गिया बार्रेचं संकट; 67 रुग्ण, 13 व्हेंटिलेटरवर; काय आहे हा नेमका प्रकार? लक्षणं काय?


 


रुग्णसंख्या 127 वर 


दरम्यान पुण्यात जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. जीबीएसच्या रुग्णांची संख्या 111 होऊन 127 वर पोहोचली आहे. एकाच दिवसात 16 रुग्णांची नोंद झाली आहे. 20 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर असून, आयुष्याशी लढा देत आहेत. 20 ते 29 वयोगटातील सर्वाधिक रुग्ण आहेत. 


'जीबीएस'ची कारणं काय?


गिया बार्रे होण्याची विविध कारणं आहेत. जसं की बॅक्टेरिअर इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे या गोष्टी आजाराला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. सिंहगड रोडवरील किरकिटवाडी, नांदेडगाव, नांदोशी, कोल्हेवाडी, धायरी आदी गावांना विहिरीतून पाणीपुरवठा होतो.  धरणातून आलेलं पाणी कुठलीही प्रक्रिया न करता,  ब्लिचिंग पावडर मिसळून नागरिकांना दिलं जातं. त्यामुळे या विहिरीतील दूषित पाणीच आजाराचं मूळ असल्याचं सांगितलं जात आहे. 


'जीबीएस'ची लक्षणं काय?


गिया बार्रे सिंड्रोम हा एक हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. जाणून घ्या या आजाराची लक्षणं काय... 


- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
- स्नायु कमकुवत होतात.
- हात, पायात मुंग्या येतात.
- अशक्तपणा जाणवू लागतो.
- बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणं.
- धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणं.


यातील कोणतीही लक्षण जाणवल्यास लगेचचं जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.