पुणे : राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुढील 48 तास धोक्याचे असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.  तर विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापुरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिका-यांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कलम 144 लावण्याचे आदेश दिले. हवामान विभागाकडून शहर आणि परिसरात पुढील 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 


अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्रास होऊ नये म्हणून  जिल्ह्यातील सर्व गडकिल्ले,पर्यटन क्षेत्र तसेच धरण परिसर तसेच तलाव परिसरात पुढील तीन दिवस म्हणजेच 14 जुलै ते 17 जुलै पर्यंत 144 कलम लावण्यात आले आहे. 


अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने कंपन्यांना शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम देण्याचे आवाहन केले आहे. पुण्यात पुढचे 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पुणे महापालिकेनं खासगी कंपन्या, आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.