पुणे : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि गोवा मुक्ती मोर्चाचे सेनानी पद्मश्री मोहन रानडे यांचे आज सकाळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. एका महान स्वातंत्र सैनिकाने आज अखेरचा श्वास घेतला आणि या राष्ट्रासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. अंत्यदर्शन सकाळी ११.३० पर्यंत, स्वरगंगा बंगला, ताथवडे उद्यानाचे जवळ, कर्वे नगर येथे घेता येणार आहे. अंत्यसंस्कार शासकीय सन्मानाने वैकुंठ स्मशानभूमी येथे संध्याकाळी ४ वाजता होणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहन रानडे यांचा जन्म  १९२९ मध्ये सांगली येथे झाला. गोवा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेले ते मराठी कार्यकर्ते होते. पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीतून गोवा स्वतंत्र करण्यासाठी छेडलेल्या मुक्तिसंग्रामातील आझाद गोमंतक दलाचे ते प्रमुख नेते होते. मोहन रानडे यांनी सुरूवातीला व्यक्तिगत पातळीवर आणि नंतर आझाद गोमंतक दल या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले. शिक्षकी पेशा स्वीकारून ते गोव्यात दाखल झालेत. त्यानंतर त्यांनी पोर्तुगीजांविरुध्द सशस्त्र बंड उभारले. पुढे बेती येथील पोलीस चौकीवर केलेले हल्ल्यात ते जखमी झाले आणि १९५५ मध्ये पोर्तुगीज पोलिसांच्या तावडीत सापडले. 


पोर्तुगालमध्ये त्यांना २६ वर्षांची सजा ठोठावण्यात आली. गोव्याच्या मुक्तीनंतर भारत सरकारने त्यांची मुक्तता करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. १४ वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्यांची जानेवारी १९६९मध्ये त्यांची सुटका झाली. 


मोहन रानडे यांच्या गोवा मुक्तिसंग्रामातील अनुभवांवर सतीचे वाण (मराठी) आणि स्ट्रगल अनफिनिश्ड (इंग्रजी) ही दोन पुस्तके लिहिली गेलीत. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गोवा शासनाने गोवा पुरस्कार ( १९८६), तर  केंद्रशासनाने पद्मश्री पुरस्कार ( २००१) देऊन त्यांना गौरवले.


 मोहन रानडे यांचा अल्प परिचय


- जन्म : २५ डिसेंबर १९३० रोजी सांगली येथे झाला 
- बाबाराव सावरकार व राममनोहर लोहियांकडून राष्ट्रकार्याची प्रेरणा.
- गोवा मुक्ती संग्रामात सशस्त्र क्रांतिकार्य
- २६ ऑक्टोबर १९५५ रोजी गोव्यातील पोर्तुगीजांच्या पोलीस ठाण्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अंगावर तीन गोळ्या झेलल्या.
- अटक झाल्यावर १३ वर्षांहून अधिक काळ सश्रम कारावास भोगला (६ वर्ष पणजी आणि पुढे सव्वा सात वर्ष पोर्तुगाल येथे तुरुंगवास)
- २६ जानेवारी १९६९ रोजी पोर्तुगाल येथून कारावासातून सुटका 
- १९८६ ला गोवा सरकारच्या गोवा पुरस्काराने सन्मानित
- केंद्र सरकारने २००१ ला पद्मश्रीने पुरस्कारदेऊन केले सन्मानित
- त्यांच्या सुटकेस ५० वर्ष पूर्ण होताना पुण्यात त्यांचा विशेष सन्मान २२ डिसेंबर २०१८ रोजी पुणे शहरात करण्यात आला होता.