मुंबई : 2006 मध्ये नांदेडच्या पाटबंधारे नगरमध्ये झालेल्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात साक्षीदार करावे असा अर्ज मुंबईतील यशवंत शिंदे यांनी नांदेड न्यायालयात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. 5 एप्रिल 2006 रोजी नांदेडच्या पाटबंधारे नगरमध्ये एका घरात स्फोट झाला होता. बॉम्ब बनवत असताना हिमांशू पानसे आणि कोंडावार हे दोघे जण ठार झाले होते तर अन्य काही जण जखमी झाले होते. सुरुवातीला हा फटाक्यांचा स्फोट असल्याचे पोलिसांनी सांगितले होते पण नंतर हा बॉम्ब बनवताना स्फोट झाल्याचे उघड झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात पहिल्यांदाच हिंदू दहशतवादाचा प्रयत्न उघड झाला होता. 2006 सालीचे हे प्रकरण अजूनही नांदेड न्यायालयात सुरू असून सोमवारी या प्रकरणाची तारीख होती. याच दिवशी न्यायालयात हजर होत मुंबई येथील रहिवाशी यशवंत शिंदे यांनी या प्रकरणात आपल्याला सर्व माहिती असल्याने साक्षीदार करावे असा अर्ज दिला. 1995 पासून आपण विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा करकर्ता असल्याचा दावा शिंदे यांनी केलाय. 


2003 साली पुणे येथे सिंहगडच्या पायथ्याशी एका ठिकाणी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन प्रांत अध्यक्ष मिलिंद परांडे, राकेश धावडे आणि मिथुन चक्रवर्ती उर्फ रवीदेव या तिघांनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते. या प्रशिक्षणाला नांदेड बॉम्ब ब्लास्ट मध्ये मारल्या गेलेला हिमांशू पानसे आणि इतर 20 जनांसोबत आपणही होतो असा यशवंत शिंदे यांचा दावा आहे. 


2004 साली देशभरात बॉम्ब ब्लास्ट करण्याचा कट होता पण तो काही कारणाने स्थगित झाला. या सह अनेक धक्कादायक दावे शिंदे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात केले आहेत. हिमांशू पानसे याला नांदेडमध्ये येऊन अनेकवेळा भेट देऊन असे काही करू नको असे आपण सांगितल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे. 


तरीही 2006 साली बॉम्ब बनवताना पाटबंधारे नगरमध्ये स्फोट होऊन हिमांशू आणि अन्य एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात काही आरोपींवर नांदेड न्यायालयात अजूनही खटला सुरू आहे. या प्रकरणात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देणारे मुख्य आरोपी असून तापस यंत्रणांनी त्यांना आरोपी केले नाही. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद परांडे, राकेश धावडे आणि मिथुन चक्रवर्ती उर्फ रवीदेव यांना आरोपी करून आपल्याला साक्षीदार करावे असा अर्ज यशवंत शिंदे यांनी दाखल केलाय. नांदेड न्यायालयाने तो अर्ज स्वीकारत यावर 22 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.