दोन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या, सावत्र बापानेच रचला कट, कारण...
Mumbai Crime News: नराधमाने दोन वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime News: मुंबई पोलिसांनी 25 वर्षीय एका तरुणाला अटक केली आहे. 2 वर्षांच्या सावत्र मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मानखुर्द येथे ही घटना घडली आहे.
नात्यात अडथळा ठरत असल्याच्या रागातून एका नराधमाने दोन वर्षांच्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापाने बालिकेच्या गुप्तांगात लाटणं घुसवून तिचा गळा आवळला. मुलीची आई घराबाहेर कामानिमित्त असताना सावत्र बापाने हा घृणास्पद प्रकार केला आहे. आरोपीने बालिकेच्या हत्येनंतर सर्व पुरावे मिटवण्याचाही प्रयत्न केला.
बालिकेच्या आईने पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दोघी मायलेकी आरोपीबरोबर राहत होत्या. आरोपीला मुलगी नात्यात अडसर आहे असं सतत वाटत होते. त्यावरुन दोघांमध्ये वाद देखील होत होते. आरोपी बालिकेवर सतत राग राग करायचा. नेहमीप्रमाणे मुलीची आई कामानिमित्त घराबाहेर गेली. दुपारी जेव्हा ती घरी परतली तेव्हा मुलगी बेशुद्धावस्थेत होती.
आरोपी व मुलीच्या आईने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या नाजूक भागावर काही जखमा होत्या. त्यामुळं त्यांनी मुलीच्या आईला याबाबत विचारलं. तेव्हा आरोपीने सांगितले की मुलगी खेळता खेळता पडली त्यामुळं जखमा झाल्या. हे प्रकरण संशयास्पद असल्याने पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने पोलिसांनाही तेच कारण सांगितले. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मुलीवर अत्याचाराची आणि हत्येची कबुली दिली. मुलीच्या अंगावर मारहाणीच्या आणि गळा आवळल्याच्या खुणा आढळल्या. तिच्या नाजुक भागावरही जखमा होत्या. आरोपीवर भारतीय न्याय संहितेसह पोक्सो कायद्यातील गंभीर कलमांनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.