Sharad Pawar On Rohit Pawar: राज्यात विधानसभा निवडणुकांपूर्वीच घडामोडींना वेग आला आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत राज्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मतदारसंघात चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. जागावाटपाची चर्चा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोहित पवार यांच्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. रोहितची नंतरची पाच वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी, असे संकेत पवारांनी दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित पवार यांच्या मतदारसंघातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. रोहितची पाच वर्ष आपल्या सेवेसाठी होती. आता या पुढच्या काळात त्याचे काम राज्यासाठी असेल, असं सांगत असतानाच शरद पवारांनी त्यांच्या मंत्रिपदाचा घटनाक्रमदेखील सांगितला आहे. 


शरद पवार यांनी म्हटलं आहे की, 'मी 1972 पासून मंत्रिमंडळात वेगवेगळ्या मंत्रालयात मंत्री म्हणून काम केलं. पवारांनी त्यांच्या मंत्रीपदापर्यंतचा घटनाक्रम सांगितला आहे. माझी पाच वर्षे आमदार म्हणून गेल्यानंतर सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण मला मिळत गेलं. मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा मंत्री झालो. वसंत दादांचे सरकार गेल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्री झालो. केवळ एकदाच मुख्यमंत्री झालो नाही तर चार वेळेस मुख्यमंत्री झालो,' असा घटनाक्रम पवारांनी सांगितला. 


पुढे ते म्हणाले की,  'रोहितचं कामदेखील तशाच प्रकारचं आहे. तुमच्याकडून रोहित यांना मंत्री बनवण्याची मागणी होते मात्र त्याने आतापर्यंत कधी कुठल्याही पदाची मागणी केलेली नाही. रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची असेल,' असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.