शरद पवारांचा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर पवारांचा निर्णय
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1 मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पवारांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर पवारांचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रशासन चिंतेत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारच्या चिंता वाढळ्या आहेत. त्यातच आता शरद पवारांनी सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
याआधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपले कार्यक्रम रद्द केले होते. अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली. त्यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींना टेस्ट करून घेण्याचं आवाहन केलं आहे. मंत्रिमंडळातल्या सहा मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे.
महत्त्वाचं म्हणजे कालच एका लग्न सोहळ्यात भुजबळ यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. याआधी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री बच्चू कडू आणि एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं होतं. मंत्रिमंडळातील तब्बल 6 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढत आहे.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने आता ज्या भागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशा भागात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय़ घेतला आहे. अमरावतीमध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागपूरमध्ये देखील कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. सरकारमधील मंत्री कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याने सरकारच्या चिंता वाढत आहेत.