पुणे : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरामध्ये शेती आणि दुग्ध व्यवसायाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना १०० टक्के कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. मी अनेक पूर पाहिले, पण अशी परिस्थिती आतापर्यंत पाहिली नाही. या पुराची व्याप्ती पाहता अभूतपूर्व अशा परिस्थितीला तोंड देण्याचा प्रसंग नागरिकांवर आला आहे, असं पवार म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राची प्रशासन यंत्रणा नेहमीच संकटाच्या काळी तयार असते, पण यावेळी मात्र शासकीय यंत्रणा कमी पडल्याचं चित्र दिसतंय, असं वक्तव्यही पवारांनी केलं. हा सगळा उसाचा पट्टा आहे. बहुतेक ठिकाणी उसाच्या उंचीपेक्षा पाण्याची पातळी जास्त आहे. द्राक्षं आणि डाळिंबाचं उत्पन्नही जास्त आहे. मोठ्या प्रमाणावर पशूधन वाहून गेलं आहे. पूरस्थितीमुळे दुधाची आवक ३५ ते ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. शेतीबरोबरच घरांचं आणि व्यवसायाचंही नुकसान झालं आहे. पाणी उतरेल तेव्हा नुकसान किती झालं ते कळेल. त्यामुळे लगेच प्रशासनाने नुकसान भरपाईची कारवाई केली पाहिजे, असं पवारांनी सांगितलं.


ही पूरस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रसेच्या लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषदेचे लोकप्रतिनिधी त्यांचं एका महिन्याचं वेतन मदत म्हणून देतील, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.


राष्ट्रवादी काँग्रेसची दुष्काळ भागात यात्रा सुरू आहे ती यात्रा आम्ही थांबवत असल्याचं शरद पवार म्हणाले. तसंच राज्य सरकारनेही एनडीआरएफसारखी यंत्रणा उभी करण्याची गरज असल्याचं मत पवारांनी व्यक्त केलं.


राज्य सरकारने यंत्रणेला प्रोत्साहन दिलं तर यंत्रणा लोकांच्या मदतीला तुटून पडते, यावेळी तसं का झालं नाही? हा प्रश्न आहे, असं शरद पवार म्हणाले. यावेळी उणंदुणं न काढता तरुणांच्या संघटना आणि सेवाभावी संस्थांनी मदतीसाठी पुढे यावं, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं. या भागातील शेती आणि दुग्ध व्यवसाय उद्धवस्त होण्याचं चित्र आहे, अशी भीती पवारांनी व्यक्त केली.