पुणे : मी कधीही भाषणासाठी जितका घाबरलो नाही, तितकी आज मला भीती वाटत आहे, असे राज ठाकरे यांनी बोलून या मुलाखतीला सुरूवात केली. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांचं यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुलाखतीला सुरूवात झाली. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मला जर प्रश्न विचारायचे असतील तर नेहमीचे प्रश्न विचारणार नाही. महाराष्ट्राला जे प्रश्न पडलेत तेच विचारणार. आणि माझी अपेक्षा आहे की पवार साहेब दिलखुलासपणे त्याची उत्तरं देणार. माझ्यासाठी माझे वडील, काका यांच्या पिढीचा शेवटचा नेता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला प्रश्न - खरं बोलल्याचा कधी त्रास झाला का?


शरद पवार - खरं बोललेलं कुणाला पचणार नसेल तर खरं बोलताना कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. 


- शरद पवार यांनी राज ठाकरे घेत असलेल्या आपल्या मुलाखतीतून केंद्रातील मोदी सरकारवर चांगलाच हल्ला चढवला. कॉंग्रेसवर ज्या पद्धतीची पातळी सोडून टीका करताहेत ते माझ्या तत्वात बसत नाही. नेहरूवरील टीका माझ्या तत्वात बसत नाही, असे शरद पवार म्हणाले. 


- शरद पवार - काही किंमत महाराष्ट्राला मोजावी लागली. पण पण बाहेरचा कुणी व्यक्ती आला तर दोन गोष्टी महत्वाच्या घडतात. एकतर त्याला जोरात मिठी मारली जाते आणि दुसरं त्यांना गुजरातला नेलं जातं. देशाचं नेतृत्व असलेल्या व्यक्तीने ध्यानात ठेवायला पाहिजे.


राज ठाकरे - पण हे तुमचा शिष्य ऎकतो का?


- शरद पवार - मोदींची एक गोष्ट आम्हाला खटकायची ती म्हणजे. ते दिल्लीत बैठक असताना अत्यंत आक्रामक हल्ला पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर करायचे. मनमोहन सिंह हे अत्यंत सभ्य व्यक्ती. त्यामुळेच कॉंग्रेसचा गुजरातकडे बघण्याचा दुष्टीकोन अनुकूल नसायचा. यात मी असा विचार करायचो की, गुजरात हा देशाचा भाग आहे. देशाचा विचार होताना गुजरातचाही विचार असायचा. त्यामुळे ते पंतप्रधान होण्याआधी दिल्ली आले की, माझ्या घरी यायचे. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी जे वक्तव्य केलं की, ते माझी करंगळी धरून राजकारणात आले. पण मुळात माझी करंगळी त्यांच्या हातात कधी सापडली नाही.


राज ठाकरे - कॉंग्रेसमधून बाहेर पडला मग समाजवादीत गेलात, पुन्हा कॉंग्रेस आता राष्ट्रवादी आत जाताना आणि बाहेर येताना काय वाटतं?


शरद पवार - मी कॉंग्रेसची विचारधारा कधी सोडली नाही. काही मतभेद झाले. पहिल्यांदा हा निर्णय घेतला तेव्हा पहिला भागीदार सुशीलकुमार शिंदे होता. नंतर आमचे अनेक सहकारी पुन्हा मुळ कॉंग्रेसमध्ये गेले. त्यांनी पुन्हा कधी कॉंग्रेस सोडली नाही. तेव्हापासून आजपर्यंत विठोबाने वीट कधी सोडली नाही. कॉंग्रेसची विट धरून आहे.



राज ठाकरे - नरसिंह राव आणि तुमच्यात काय झालं?


शरद पवार - नरसिंह रावांनी मला बोलवलं. तेव्हा मी संरक्षण मंत्री होतो. देशाचं चांगलं करण्यासाठी मी काही धोरणं आखली आहे. पण जगाचं लक्ष हे मुंबईकडे आहे. कारण हे महाराष्ट्र जळत होता. त्यामुळे जगातल्या इथं गुंतवणूक करणा-यांना देशांना विश्वास देण्यासाठी महाराष्ट्र सावरला पाहिजे. माझी तयारी नव्हती. नंतर मला यावं लागलं.


राज ठाकरे - अशा काही गोष्टी प्रत्येक राज्याकडे आहेत ज्यासाठी त्या त्या राज्यातील लोकं एकत्र येतात. तसं महाराष्ट्राकडे काय हुक आहे ज्यासाठी महाराष्ट्रातील लोकं एकत्र येतील?

शरद पवार - शिवाजी महाराज. 


राज ठाकरे - मग भाषणात बोलताना तुम्ही शाहू, फुले आणि आंबेडकर अशी सुरुवात करतात?


शरद पवार - असं काही नाहीये. महाराष्ट्र शिवाजी महाराजांचाच आहे. पण या तीन माणसांनी समाजाला एकसंघ करण्यासाठी जात, पात धर्म याचा लवलेशही ना राहता एकत्र कसा राहिल यासाठी लढले. अजूनही याचा विचार आहे. तुमचे आजोब प्रबोधनकार ठाकरे यांनाही हे माहिती आहे. महाराष्ट्र हा मजबूतच झाला पाहिजे. मध्यंतरी राज्यात जे प्रकार घडले त्यावरून अजूनही शाहु फुले आंबेडकरांच्या विचारांचं स्मरण आवश्यक असल्याचं म्हणावं लागेल. अन्यथा महाराष्ट्र दुबळा होईल. ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. बाळासाहेबांनी कधी कुणाची जात धर्म बघितला नाही. आज जातीवाचक संघटना मूळ धरायला लागल्या आहेत. त्याचा लाभ आपल्याला होईल असं शासनकर्त्यांना वाटतं. पण ते फार काळ टिकणार नाही.


राज ठाकरे - आजही वेगळ्या विदर्भाची मागणी का होतीये?


शरद पवार - वेगळा विदर्भ हे अमराठी नेतृत्वाचं स्वप्न आहे. लोकमत घ्या आणि लोकांनी कौल दिला तर वेगळा विदर्भ करा. पण ते तसं करत नाहीत. वेगळ्या विदर्भाची मागणी ही जास्तकरून काही ठराविक जिल्ह्यांचीच आहे. 


राज ठाकरे - नरेंद्र मोदी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करणार आहेत. संयुक्त महाराष्ट्रापासूनची गुजरातची जी जखम आहे, ती भरून काढण्याची ही धडपड आहे का? हे मुंबई स्वतंत्र करण्याचं षडयंत्र आहे का?


शरद पवार - दोन गोष्टी आहेत त्यात. आम्ही लोकांनी त्यात बुलेट ट्रेनला विरोध केला होता. ती करायची असेल तर दिल्ली-मुंबई करा असे आम्ही बोललो होतो. फक्त अहमदाबादला कुणी जाणार नाही. मुंबईला येतील. मुंबईची गर्दी वाढेल. दुसरी गोष्ट अशी की, मुंबई-अहमदाबाद या स्टेजमध्ये ट्रेनमध्ये बसणा-यांची संख्या पाहिली तर बुलेट ट्रेनची काहीच गरज नाही. एक गोष्ट महत्वाची म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडून नेऊ शकत नाही.


राज ठाकरे - कॉंग्रेसचं भवितव्य काय वाटतं? आणि राहुल गांधींबद्दल तुमचं काय मत आहे?


शरद पवार - जुनी कॉंग्रेस गावागावात होती. देशात लोकशाही उभी करणारी होती. आज अनेक ठिकाणी कॉंग्रेस दुबळी झाली आहे. त्याचं नेतृत्व करण्याचं आव्हान या तरूणावर पडली आहे. मी आता बघतोय की, या तरूणाची शिकण्याची तयारी आहे. गावागावात जाऊन तो माहिती घेतोय. मी संरक्षण मंत्री झालो तेव्हा मला रॅंक माहिती नव्हत्या. मी शपथ घेतली आणि दुस-या दिवशी आर्मीचे नंबर दोनचे व्यक्ती त्यांना फोन केला. मी त्यांच्याकडे जाऊन त्याबाबत सगळी माहिती समजून घेतली. आज राजकारणात सगळ्या विषयांचे तज्ञ तुम्ही असू शकत नाही पण विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राहुल गांधी तो प्रयत्न करताना दिसताहेत.


राज ठाकरे - असा कोणता नेता आहे जो गेल्यावर तुम्हाला चटका लावून गेला?


शरद पवार - केवळ राजकीय विचाराल तर यशवंतराव चव्हाण. देशाची प्रतिष्ठा वाढवणारा माणूस. दुसरा म्हणजे देशाचा विचार करणारा व्यक्ती म्हणजे माझे मित्र बाळासाहेब ठाकरे. 


राज ठाकरे - इतक्या वर्षात कधी देव आठवला का?


शरद पवार - काही ठिकाणी मी जातो. मला चांगलं वाटतं. मला तिथे शांतता मिळते. पंढरपूरचा विठ्ठल, तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची आंबाबाई, गणपती पुळेचा गणपती इथं गेलो की माझ्या मनाला मानसिक समाधान मिळतं. मला काही मिळवायचं असेल तर त्यासाठी मलाच मेहनत करावी लागणार आहे हे मला माहिती आहे. 


राज ठाकरे - तुमच्यावर अनेक आरोप झालेत, या सगळ्या आरोपांवर तुम्ही कधी स्पष्टीकरण देत नाहीत?


शरद पवार - अशा प्रकारांना मी कधी महत्व देत नाही. दाऊद आणि माझी दोस्ती असा आरोप केला होता. कशाचा काही संबंध नाही. मग प्रश्न कसा आला याच्या खोलात मी गेलो. दाऊदचा भाऊ दुबईत होता. हे कुटुंब कोकणातलं. त्याचा भावाला काही प्रश्न विचारले बरेच. तू मुंबईत का येत नाही. तो म्हणाला, आम्हाला तिथे यायचंय. पण येता येत नाही. सरकार आम्हाला मारेल. त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. त्याला विचारलं मुख्यमंत्री कोण आहे, माहिती आहे का? तो म्हणाला होय, ते आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना का ना ओळखणार....तिथून हा प्रश्न उपस्थित झाला. तथ्य असलेल्या गोष्टींची चिंता करत बसू नये, त्याने त्रास होतो.


राज ठाकरे - शेवटचा प्रश्न राज कि उद्धव?


शरद पवार - ठाकरे कुटुंबिय.