Devendra Fadanvis On Maha Vikas Aghadi:  पक्ष फोडण्याचा जो आरोप केला जातोय. ते लोक काय दुध पिणारी मुलं आहेत का, असे पक्ष फोडता येतात का? शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले ते त्यांच्यात  अतिअहंकार व अतिमहत्त्वकांक्षेमुळं, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना सोबत घेऊन महायुतीचे सरकार स्थापन केले. राज्यात पुन्हा भाजप सत्तेत आल्यानंतर फडणवीसांनी एक वक्तव्य केले होते. मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो, असं वक्तव्य फडणवीसांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली होती. तर, विरोधकांनी या वक्तव्यांवरुन टीकेची झोड उडवली होती. दोन पक्ष फोडून सरकार स्थापन केलं, या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी थेट उत्तर दिलं आहे. तसंच, हे पक्ष का फुटले, याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे. 


महाविकास आघाडीचे सरकार हेच मुळात बहुमत फोडून तयार केलेले होते. जनतेने बहुमत भाजप व शिवसेनेना दिले होते. ठाकरेंना खुर्चीची लालसा इतकी होती की त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली होते. पहिल्यांदा मुल्याचं राजकारण सोडून, तत्व सोडून, बहुमत मोडून व आमच्या पाठित खंजीर खुपसून ते गेले. आता जो पक्षा फोडण्याचा आरोप केला जातो. हे लोक काय दूध पिणारे मुलं आहेत का? असे पक्ष फोडता येतात का?. मुळातच अतिअहंकार व अतिमहत्वकांक्षेमुळं हे पक्ष फुटले, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.


शिवसेनेच्या नेत्यांच्या ज्यावेळी लक्षात आले की राजकारण हे केवळ स्वतःकरिता आणि पक्षाकरता चाललंय. आज मी आणि उद्या आदित्य या करिता राजकारण चाललंय. एकीकडे हिंदुत्व सोडल्यामुळं जमीन सरकरतेय. केवळ आदित्य ठाकरेंना लिडरशिप द्यायचीये, यासाठी सर्व सुरू आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंसारखे स्वाभिमानी लोक एकत्र आले. त्यांनी निर्णय केला. इथे विचारही गेलाय आणि आता आपल्यालाही संपवतायत. आपल्या अस्तित्वाची लढाई आणि विचारांची लढाई आता आपल्यालाच लढावी लागेल, या विचाराने ते आमच्यासोबत आले. शिवसेनेसारखीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्येदेखील आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. 


राष्ट्रवादीमध्ये तीन वेळा चर्चा झाली. ती शरद पवारांनीच केली. तीन वेळा शरद पवारांनी निर्णय घेतला. शेवटच्या क्षणी अजितदादांना समोर केले. मग निर्णय परत घेऊन अजित दादांना तोंडघशी पाडले. अजित दादांना व्हिलन केले. अजित दादांना का व्हिलन केले? ते एकाच कारणांसाठी केले कारण अजितदादांना व्हिलन केले तरच सुप्रिया ताईंच्या हाती पक्ष जाईल. हे सगळं इतकं स्पष्ट आहे. हे पक्ष त्यामुळं फुटलेत. जे फुटले आमच्याकडे आले तर आम्ही संधी घेतली हे पण खरं आहे. हे पक्ष त्यांच्या अतिमहत्त्वकांक्षेमुळं फुटलेत, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे.